सांगली : महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत प्रोत्साहन अनुदानासाठी निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध केलेल्या यादीत जिल्ह्यातील केवळ सहा हजार ७०० शेतकऱ्यांची नावे आली आहेत. आतापर्यंत ८० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे. मात्र, तब्बल ५० हजार नियमित कर्जदार तब्बल साडेचार वर्षांपासून वंचित असल्याचे स्पष्ट झाले. या शेतकऱ्यांना शासनाकडून निधी मिळणार का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ त्यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शासनाने नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. त्यासाठी शासनाच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली. मात्र, अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष झाले. राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकारने योजनेची अंमलबजावणी सुरू केली. नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील एक लाख ६२ हजार ७९५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती शासनाने पोर्टलवर अपलोड केली आहे.मागील साडेचार वर्षांत जिल्ह्यातील ८० हजार ३३७ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदानाची २९४ कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. पन्नास हजार अथवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या रकमेएवढी रक्कम मिळाली. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. अशा सुमारे २२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी आधार प्रमाणीकरण न झालेले तसेच तक्रारी असलेले सहा हजार शेतकऱ्यांनाही अद्याप प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील सहा हजार ७०० शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाला प्राप्त झाली आहे. यापैकी सहा हजार शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे. प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दि. ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा लघुसंदेश महा-आयटीमार्फत दिला आहे. याशिवाय जिल्ह्यातील अद्याप ५० हजार शेतकऱ्यांचे सुमारे १५० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान लटकले आहे. शासनाकडून अनुदान वर्ग करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पात्र शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित असल्याचे चित्र दिसून येते.
७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंक नाहीजिल्ह्यातील सहा हजार सातशे शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाला प्राप्त झाली आहे. यापैकी सहा हजार शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे. अद्याप ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंक नाही. आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
नियमित कर्जदारांची माहितीशेतकरी यादी अपलोड १,६२,७९५अनुदान जमा शेतकरी ८०,३३७अनुदान मिळालेली रक्कम २९४ कोटीनव्याने आलेल्या यादीतील शेतकरी ६,७००