सांगली : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७० बालकांवर मुंबईत शुक्रवार, दि. ४ डिसेंबरला मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी बालकांना घेऊन जाणाऱ्या बसेस आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते पूजन करुन रवाना करण्यात आल्या. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या प्रयत्नाने या बालकांना पुन्हा बागडण्याची संधी मिळणार आहे. अंगणवाडी व शाळांतून करण्यात आलेल्या बालकांच्या आरोग्य तपासणीत जिल्ह्यातील ७० बालकांना हृदयरोग असल्याचे निदान स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार असल्याने त्याला खर्चही मोठा येणार होता. अखेर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया होण्यासाठी कार्यवाही सुरु केली होती. त्यानुसार राजीव गांधी जीवनदायी योजनेतून काही खर्च घालून उर्वरित रकमेसाठी मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टला आवाहन करण्यात आले होते. त्यांनीही आवाहनाला प्रतिसाद देत मदतीची तयारी दर्शवली. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी गायकवाड यांनी त्यांच्याशी चर्चा करुन मदतीची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. त्याचबरोबर सर्व बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नेरुळ (नवी मुंबई) येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५२, तर उर्वरित बालकांवर सुराणा रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सभापती गजानन कोठावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिद्दीने कामे कराराज्यासह पावसाने यंदा दगा दिल्याने जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. अशा गंभीर परिस्थितीत केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांनी दुष्काळाबाबत जिद्दीने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार जयंतराव पाटील यांनी गुरुवारी केले.
हृदयशस्त्रक्रियेसाठी ७० बालके मुंबईला रवाना
By admin | Published: December 03, 2015 11:27 PM