सांगली : जिल्ह्यातील २६८ एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर व्हावे यासाठी सेवा समाप्तीच्या नोटिसा मंगळवारी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी चार कर्मचारी कामावर हजर झाले. विविध आगारांतील ७० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा २५८ वर गेला आहे.
एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ८ नोव्हेंबरपासून सांगलीतील एसटी कर्मचारी संघटना कृती समितीही यात उतरली. त्यामुळे जिल्ह्यातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. शासनाकडून आश्वासन देऊनही कर्मचारी आंदोलन मागे घेत नसल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गुरुवारी ७० कर्मचाऱ्यांना संपात सहभागी झाल्याबद्दल निलंबित केले. संपाचा प्रवासी सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार खासगी प्रवासी वाहनांना अधिकृतपणे प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली. परंतु, अद्यापही काही मार्गांवर प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संप मिटण्याची प्रतीक्षा लागून राहिली. मंगळवारी संपात सहभागी झालेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीवरील २६८ कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर हजर राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या. यामुळे अवघे चार कर्मचारी गुरुवारी कामावर हजर झाले. दरम्यान, खासगी शिवशाही बसेसच्या माध्यमातून पुणे मार्गावर वाहतूक सुरळीत आहे, तर जत-विजापूर, मिरज ते कागवाड या बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत.