ओळ : पलूस येथे नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे मृत झालेल्या कोंबड्यांची पिले.
पलूस : पलूस येथे नगरपरिषदेची पाण्याची टाकी ओव्हरफ्लाे झाल्याने ७०० कोंबड्यांची पिले नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्युमुखी पडली. यामध्ये राजेंद्र काेंडिराम सूर्यवंशी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ८ मे राेजी पहाटे ही घटना घडली.
पलुस येथील पाण्याच्या टाकीजवळ राजेंद्र कोंडीराम सूर्यवंशी यांचे राहते घर व जवळच देशी कोंबड्यांचे शेड आहे. नुकतीच त्यांनी ७०० देशी काेबड्यांची पिले आणली होती. ८ मे च्या पहाटे झाेपेत असताना डोक्याला पाणी लागल्याने त्यांना जाग आली. उठून पाहिले असता घरात सर्वत्र पाणी साचले हाेते. त्याक्षणी त्यांनी बाहेर काेंबड्यांच्या शेडकडे धाव घेतली. यावेळी जवळच असलेल्या नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीतील पाणी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बंद न केल्याने ओव्हरफ्लो झाले. या पाण्याने सूर्यवंशी यांच्या शेडमधील सर्व ७०० पिले मृत झाली. याबाबत त्यांनी नगरपरिषदेकडे तक्रार केली असता पाणी पुरवठा विभागाकडून हलगर्जीपणा झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
तहसीलदार निवास ढाणे, मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी घटनास्थळी पाहणी करून तलाठ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे पंचनामा अपुरा असल्याचे तलाठी बाबूराव जाधव यांनी सांगितले.
चौकट...
हा प्रकार नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे झाला आहे, त्या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही आग्रही आहे.
- सुधीर जाधव, तालुका उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना