सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याने रविवारी दिलासा मिळाला. दिवसभरात ७१ नवे रुग्ण आढळून येतानाच आटपाडी तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला, तर ४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १८ रुग्ण आढळले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून वाढतच चाललेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने चिंता वाढली आहे. रविवारीही काहीशी संख्या कमी होत ७१ रुग्ण आढळले असले तरी तुलनेने बाधितांची संख्या जास्तच आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी आरटीपीसीआरअंतर्गत ९३७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४९ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ६५४ जणांच्या तपासणीतून २७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होताना ७९४ सध्या उपचार घेत आहेत. ६३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५९ जण ऑक्सिजनवर उपचार घेत असून ४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांसह वर्धा, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.