सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना बुधवारी एकाच दिवसात तब्बल ७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बुधवारी बाधितांच्या संख्येचा उच्चांक नोंदला गेला असून सांगली शहरात ६३ व्यक्तींना कोरोनाचे निदान झाले. यात महापालिकेच्या सावली निवारा केंद्रातील ५२ जणांचा समावेश आहे, तर ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ बुधवारीही कायम होती. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३० ते ४० नव्या रूग्णांची भर पडताना बुधवारी एकाच दिवसात ७५ नवीन रूग्ण आढळून आल्याने कोरोनाचा कहर वाढतच आहे. बुधवारी सांगली शहरात सर्वाधिक ६८ रूग्ण आढळले आहेत. यात ५७ पुरूष, तर ६ महिलांचा समावेश आहे.
महापालिकेच्यावतीने बेघर, निराधारांसाठी चालविण्यात येत असलेल्या सावली निवारा केंद्रातील ५२ जणांचा समावेश आहे. सांगली, मिरजेतील कुदळे प्लॉट येथील तिघांसह संजयनगर, सांगलीवाडी, बेथेलनगर, गणेश तलाव परिसर, कमानवेस, भारती रुग्णालयातील विद्यार्थी, धामणी रोड, न्यू इंग्लिश स्कूल परिसर, बायपास रोड, अभयनगर, अंबिकानगर सांगली-मिरज रोड, आंबेडकरनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.कडेगाव तालुक्यात पाच नवे रुग्ण आढळले आहेत. यात अलाहाबादहून येतगाव येथे आलेल्या ६२ वर्षीय ज्येष्ठाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतून आलेल्या बाधिताच्या संपर्कातील हिंगणगाव खुर्द येथील २५ वर्षीय तरुण त्यालाही कोरोनाचे निदान झाले आहे. ठाण्याहून तडसर येथे आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाचे निदान झाले आहे, तर उपाळे मायणी येथील ४५ वर्षीय व्यक्ती हृदयरोगावरील उपचारासाठी कºहाड येथील रुग्णालयात दाखल असतानाच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शाळगाव येथील ७० वर्षीय वृध्दाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील २० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पलूस तालुक्यातील नागठाणे येथील बाधिताच्या संपर्कातील २० वर्षीय तरूणास कोरोनाचे निदान झाले आहे, तर सांडगेवाडी येथील ३५ वर्षीय तरुणाचा अपघात झाल्याने महिनाभरापासून सांगलीतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. येथेच त्याला कोरोनाची लागण झाली आहे. यासह पांढरेवाडी (ता. आटपाडी) येथील ७० वर्षीय वृध्दालाही कोरोनाची बाधा झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २२ जणांची प्रकृती गंभीर बनली आहे. यातील पंढरपूर रोड, मिरज येथील ७३ वर्षीय वृध्दाची प्रकृती चिंताजनक आहे.