सांगली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविलेल्या २० पैकी १५ जणांनी विजय प्राप्त केला; तर पाचजणांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडेभाजपमधून राष्ट्रवादी व काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या चौघांचा पराभव झाला. माजी महापौर विवेक कांबळे यांचा थोडक्या मतांनी झालेला पराभव धक्कादायक निकाल ठरला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये २५ ते ३० विद्यमान नगरसेवक प्रवेश करतील, असा अंदाज होता. पण काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार यादीची चर्चाच लांबविल्याने अनेकांचा प्रवेश थांबला गेला. त्यातून मिरजेतील सात ते आठ आजी-माजी नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला, तर सांगलीतून राष्ट्रवादीचे महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, काँग्रेसचे अक्षय पाटील यांना अगदी शेवटच्या क्षणी भाजपचे एबी फॉर्म देण्यात आले.
मिरजेतील सुरेश आवटी गटाने निवडणुकीआधीच भाजपचा वाट धरली होती. त्यांच्यासोबत जनता दलाच्या संगीता खोत, रिपाइंचे राज्य सचिव तथा माजी महापौर विवेक कांबळे, जयश्री कुरणे, राष्ट्रवादीचे आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे यांच्यासह सात ते आठजणांचा समावेश होता. त्या सर्वांना भाजपने उमेदवारी दिली होती. सुरेश आवटी यांनी स्वत: मैदानात न उतरता संदीप व निरंजन या दोन्ही पुत्रांना रिंगणात उतरविले. ते दोघेही विजयी झाले. संगीता खोत, शांता जाधव, गणेश माळी, आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे हे पाच उमेदवारही निवडून आले; पण विवेक कांबळे व जयश्री कुरणे यांना विजय मिळविता आला नाही. कांबळे यांचा तर सात मतांनी पराभव झाला.
सांगलीतून लक्ष्मण नवलाई, जगन्नाथ ठोकळे भाजपमध्ये गेले. उमेदवारी निश्चितीवेळी मनसेतून स्वाती शिंदे भाजपवासी झाल्या, तर अगदी शेवटच्या क्षणी महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अनारकली कुरणे, नसीम नाईक, अक्षय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. ते सर्वजण विजयी झाले. काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेले शैलेश पवार यांना भाजपने पुरस्कृत केले; पण त्यांचा पराभव झाला.
कुपवाडमधून मोहन जाधव, रवींद्र सदामते, सीमा बुधनाळे, राजेंद्र कुंभार भाजपवासी झाले होते. जाधव जनता दलाचे समर्थक होते. भाजपने त्यांच्या पत्नी सिंधू यांना उमेदवारी दिली होती, तर कुंभार यांनी सांगलीवाडीतून काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती; पण ऐनवेळी त्यांना भाजपने प्रभाग ८ मधून उमेदवारी दिली. कुंभार वगळता इतर सर्वांचा पराभव झाला.
भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांना पराभवाचा धक्का बसला. खोत व त्यांचे पुत्र महावीर या दोघांनाही दणका बसला, तर काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या नगरसेविका पद्मिनी जाधव यांना पराभवाला सामोरे जावे लागले.मुस्लिम, धनगर समाजाचे प्रतिनिधी वाढलेनव्या सभागृहात धनगर व मुस्लिम समाजाचे प्रतिनिधीत्व वाढले आहे. मुस्लिम समाजाचे १२, तर धनगर समाजाचे १३ उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे भाजपकडून तीन मुस्लिम उमेदवार विजयी झाले. त्यात अनारकली कुरणे, नसीम शेख व नसीम नाईक यांचा समावेश आहे, तर राष्ट्रवादीकडून रईसा रंगरेज, नर्गिस सय्यद, रझिया काझी, अतहर नायकवडी, मैनुद्दीन बागवाग, काँग्रेसकडून वहिदा नायकवडी, मदिना बारुदवाले, फिरोज पठाण, हारूण शिकलगार विजयी झाले.
धनगर समाजाचे १२उमेदवार विजयी झाले. त्यात अस्मिता कोळेकर, मालन हुलवान, संगीता खोत, गजानन मगदूम, प्रकाश ढंग, कल्पना कोळेकर, संजय यमगर, लक्ष्मी यमगर, मनगू सरगर, सविता मदने, विष्णू माने, मनोज सरगर, गजानन आलदर यांचा समावेश आहे. भाजपकडून ८, राष्ट्रवादीकडून ३, काँग्रेस १ व अपक्ष १ नगरसेवक धनगर समाजाचा आहे.