सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्यामुळे अलमट्टी धरणात ८७.३५ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ७० टक्के भरले आहे. धरणात एक लाख ७५ हजार ७११ क्युसेकने पाण्याची आवक होत असल्यामुळे दुपारी चारपासून ७५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे तेथून विसर्ग वाढविला आहे.कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, तर माजी राज्यमंत्री आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन पाठवून अलमट्टीतून विसर्ग वाढविण्याची विनंती केली होती. सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अलमट्टीतून बुधवारी ७५ हजार क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. पाऊस वाढला तर अलमट्टीतून आणखी विसर्ग वाढविण्यात येईल, असे कर्नाटकच्या जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शिराळा तालुक्यात २९.३ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) :मिरज १०.४ (१४२.९), जत १८.२ (११८.७), खानापूर ६.७ (८९.९), वाळव ८.३ (१७९.४), तासगाव ७.५ (१५६), शिराळा २९.३ (४६८.२), आटपाडी १४.८ (१००.८), कवठेमहांकाळ १६.४ (१२६.७), पलूस ६.७ (१४१.३), कडेगाव ७.१ (११३.७).
सांगलीत कृष्णेची पाणीपातळी १९ फुटांवरजिल्ह्यात पावसाने दिवसभर उघडीप दिली असली, तरी कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे. यामुळे कोयना धरणाच्या विद्युतगृहातून दुपारी चारला २१०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी सहाला १९ फुटांवर गेली होती. पावसाची उघडीप असल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
असा वाढविला विसर्गमंगळवारी अलमट्टी धरणातून ७००० क्युसेकने विसर्ग होता. यात वाढ करून बुधवारी सकाळी १५०००, ११ वाजता ३००००, दुपारी ४२५०० आणि दुपारी चार वाजता पुन्हा वाढवून ७५००० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.