सांगली : ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथील शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या शेतात थोडा थोडका नव्हे, तर चक्क पाऊण किलो वजनाचा कांदा पिकलाय. त्याला पहायला आणि हनुमंतरावांचे कौतुक करायला अवघा गाव लोटला आहे. तुम्ही आतापर्यंत जास्तीजास्त ५०-१०० ग्राम वजनाचा कांदा पाहिला असेल, पण या कांद्याने सारेच विक्रम तोडले आहेत.
हनुमंतरावांनी ऊसात आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. त्यामुळे ऊसासोबतच कांद्यालाही मुबलक खतपाणी मिळत गेले. सध्या उसाच्या भरणीसाठी त्यांनी कांदा काढायला सुरुवात केली. सुरुवातीला १०-१२ मोठे कांदे निघाले. नंतर मात्र सरसकट कांदे असेच वजनदार निघू लागले. गेली अनेक वर्षे कांदा पिकविणाऱ्या शिरगावे यांच्यासाठी ही अनोखी बाब होती. वजन केले असता प्रत्येक कांदा सरासरी चक्क ७५० ते ८०० ग्रॅमपर्यंत वजनदार भरला. कांद्याचा फड पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.
शिरगावे यांनी सांगितले की, लावणीसाठी बाजारपेठेतून नेहमीचे कांद्याचे तरु (रोपे) आणले होते. उसासोबतच दोनवेळा अळवणी केली. ह्युमिक, फुलविक, सिव्हिडची दोनवेळा फवारणी केली. उसासाठी केलेला हा प्रयोग कांद्यासाठीही लागू पडला. कांद्याच्या या दणदणीत उत्पादनाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदिप राजोबा यांनी शिरगावे यांचा सत्कार केला.