तालुक्यात काही ठिकाणी दुरंगी आणि काही ठिकाणी तिरंगी लढती होत्या. मालगावमध्ये सायंकाळपर्यंत मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. तसेच एरंडोली, म्हैसाळ, लिंगनूर, मल्लेवाडीसह इतर गावांत स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आल्याने मोठी चुरस होती. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यांत आला होता. मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास प्रतिबंध हाेता.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदाराच्या हातावर सॅनिटायझर देऊन व प्रत्येकाचे तापमान तपासून मतदानासाठी प्रवेश देण्यात आला. गावापासून लांब अंतरावर शेतात, वाड्या, वस्त्यांवर राहणाऱ्या ग्रामस्थांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांकडून वाहनांचा वापर करण्यात येत होता. मालगावात मतदान केंद्राबाहेर दिवसभर मतदारांची गर्दी होती.
चाैकट
५५६ उमेदवार रिंगणात
तालुक्यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. डोंगरवाडी येथील २ आणि इनामधामणीमधील १ जागा रिक्त राहिली आहे. रिंगणातील २४१ जागांसाठी मालगाव येथे ५९, मल्लेवाडी २५, विजयनगर २०, म्हैसाळ ३४, शिपूर १६, कर्नाळ २८, भोसे १७, कळंबी ३१, एरंडोली ३९, आरग ५१, लिंगनूर २८, शिंदेवाडी १९, लक्ष्मीवाडी ११, तानंग २४, ढवळी १०, कवलापूर २८, डोंगरवाडी १०, अंकली १९, इनामधामणी ५, चाबूकवारवाडी १८, कवठेपिरान ३४ आणि तुंगमध्ये ३० अशा ५५६ उमेवारांचे नशीब शुक्रवारी मतपेटीत बंद झाले.
चाैकट
किरकाेळ बाचाबाची
उमेदवार समर्थकांना मतदान केंद्राबाहेर अडवल्याने काही गावांत बाचाबाचीचे प्रकार घडला. मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत प्रवेश बंद असतानाही उमेदवारांनी वाहने आतमध्ये आणल्याने काही ठिकाणी उमेदवार समर्थक व पोलिसांत किरकोळ वादावादीचा प्रकार घडला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.