विटा : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू उपसा योजनेसाठी अर्थसंकल्पात यावर्षी तरतूद असलेला ७८ कोटी रूपयांचा निधी तातडीने कृष्णा खोरे महामंडळाकडे वर्ग करावा, असा आदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. त्यावेळी ‘टेंभू’साठी आणखी अतिरिक्त ८० कोटी रूपयांचा निधीही दिला जाईल, असे आश्वासनही यावेळी मंत्री मुनगंटीवार यांनी दिले.मुंबईत मंत्रालयात सोमवारी दुपारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात टेंभू योजनेच्या निधीबाबत बैठक झाली. यावेळी मंत्री मुनगंटीवार यांच्यासह अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. अनिल बाबर, सांगोल्याचे ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख, ‘जलसंपदा’चे प्रधान सचिव सतीश गवई, सहसचिव व्ही. एम. कुलकर्णी, ‘कृष्णा खोरे’चे कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, सांगलीचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुसाळे उपस्थित होते.या बैठकीत आ. अनिल बाबर यांनी दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेच्या अपूर्ण कामाबाबत माहिती दिली. आ. बाबर यांनी अर्थसंकल्पात ‘टेंभू’च्या कामासाठी तरतूद केलेला ७८ कोटी रूपयांचा निधी तातडीने महामंडळाकडे वर्ग झाल्यास ‘टेंभू’ची बरीच कामे मार्गी लागतील. तसेच ‘टेंभू’च्या कामासाठी आणखी ८० कोटी रूपये निधीची तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचे मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना ‘टेंभू’च्या एकूण कामासाठी अजून किती निधी लागेल, याची विचारणा केली. अधिकाऱ्यांनी ‘टेंभू’ची संपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अजून दोन हजार कोटी रूपयांची आवश्यकता असून त्यातील ५०० कोटी रूपयांचा निधी मिळाल्यास मुख्य कालव्यासह पोटकालव्यांची कामे पूर्ण होतील, असे सांगितले. मुनगंटीवार यांनी, यावर्षीच्या अर्थसंकल्पातील मंजूर ७८ कोटींचा निधी तातडीने वर्ग करीत असून, आणखी ८० कोटींचा निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)अपूर्ण कामे मार्गी लागणार : बाबर आ. अनिल बाबर यांनी सांगितले की, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात सोमवारी टेंभू योजनेच्या निधीबाबत बैठक झाली. अर्थसंकल्पात ‘टेंभू’साठी ७८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तो तातडीने वर्ग करण्याच्या सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. आणखी ८० कोटी रूपये निधी देण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे चालू वर्षात टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांसाठी १५८ कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याने ‘टेंभू’ची अपूर्ण कामे बऱ्यापैकी मार्गी लागण्यास मदत होईल.
‘टेंभू’साठी ८० कोटी देणार
By admin | Published: June 23, 2015 12:02 AM