सांगली : जिल्ह्यात ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले. थेट सरपंच निवडीमुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे जाणवले. किरकोळ तक्रारी वगळता निवडणूक प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. मतमोजणी मंगळवारी (दि. २०) संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे.दहा तालुक्यांतील ७ हजार २७४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये आज बंद झाले. १० लाख ९० हजार ४२४ मतदारसंख्या होती. त्यांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी उमेदवारांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मोठ्या गावांत सायंकाळी वेळ संपली, तरी मतदार रांगेत थांबले होते. थेट सरपंच निवडीमुळे एकेक मतासाठी प्रयत्न झाले. दुपारी बारा वाजताच मतदानाचे जिल्ह्याचे प्रमाण ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.
संवेदनशील गावांत तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक ठिकाणी विरोधी कार्यकर्ते आमनेसामने आले; पण पोलिसांनी त्यांना पांगविले. जतसह काही तालुक्यांत मतदान यंत्रे बंद पडल्याच्या तक्रारी झाल्या. प्रशासनाने पर्यायी यंत्रे तयार ठेवल्याने प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.प्रमुख लढती भाजपविरोधात अन्य अशाच राहिल्या. काही गावांत भाजप, राष्ट्रवादीमध्येच दोन-तीन गटांत लढती रंगल्याचे पाहायला मिळाले. बंडखोरांची समजूत काढण्यात नेत्यांना अखेरपर्यंत यश न आल्याने चुरस वाढली.
दुपारपर्यंत चुरशीने मतदानदुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी अशी : मिरज ६६.४२, सांगली पश्चिम ६३.०४, तासगाव ६९.०९, कवठेमहांकाळ ६५.४५, जत ५७.१८, खानापूर ६५.२०, आटपाडी ६७.३३, पलूस ७०.६१, कडेगाव ७०.०९, वाळवा ६९.९९, आष्टा अप्पर ७१.५३, शिराळा ६९.२५, एकूण ६६.५७ टक्के.
बुथवर महिलांचे राज्य
अनेक गावांतील बुथवर महिलांनी कामकाज हाताळले. मतदारांना केंद्र व मतदान प्रक्रिया समजावून सांगितले. मतदारयादी घेऊन दिवसभर बुथवर बसलेल्या महिलांनी निवडणूक प्रक्रियेत पुरुषांच्या बरोबरीने सहभाग नोंदविला.