सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मोठ्या चुरशीने सरासरी ८०.२० टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असलेल्या गावांत निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. सोमवार दि. १८ राेजी सकाळपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १४३ ग्रामपंचायतींमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रणधुमाळी सुरू होती. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यात तासगाव, जत आणि मिरज तालुक्यात निवडणुकीत सर्वाधिक चुरस दिसून आली. त्यामुळे सकाळपासूनच या तालुक्यात मतदान केंद्रांवर गर्दी होती. दुपारी गर्दी थोडी ओसरली, पण चारनंतर पुन्हा एकदा मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना कसरत करावी लागली.
जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात लेंगरेवाडीत मतदान केंद्राबाहेर काही वेळ गोंधळ झाला होता. यासह इतर ठिकाणी मतदारांना आपल्याकडे घेण्यावरूनही कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. पण पोलिसांनी हा गोंधळ कमी करत नियंत्रण मिळवले. सायंकाळी साडेपाचची वेळ असताना अनेक ठिकाणी मतदान बाकी असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरूच हाेते. त्यामुळे अंतिम आकडेवारी येण्यास उशीर लागणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, आता सोमवारी प्रत्यक्षात मतमोजणी करण्यात येणार असल्याने सध्या तरी जिल्ह्यातील ३०७२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
चौकट
तालुका गावे झालेले मतदान टक्केवारी
मिरज २२ ९१, ७९४ ७८.४५
तासगाव ३६, ७६,५७७ ७९.८१
कवठेमहांकाळ १० १३०९५ ८३.६८
जत २९ ४७, ५९६ ८३.३८
आटपाडी ९ १३, ६७७ ७७.७९
खानापूर ११ १५, ३५७ ७६.११
पलूस १२ ३३, ४४८ ८२.६०
कडेगाव ९ १५, ७६९ ८०.३६
वाळवा २, २, ५४० ८५.८७
शिराळा २ ३, ५२३ ८३.०७