सदानंद औंधे
मिरज , दि. २६ : किराना घराण्याचे अध्वर्यू, संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांनी चाळीस वर्षे मिरजेत वास्तव्य केलेला गवई बंगला ही वास्तू किराना घराण्यातील गायकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र गवई बंगल्यात खाँसाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी गेली ८० वर्षे त्यांच्या शिष्यांचा संघर्ष सुरू आहे.
अब्दुल करीम खाँ यांची मिरज ही कर्मभूमी. उत्तर प्रदेशातील कैराना येथील खाँसाहेब मिरजेशी एकरूप झाले होते. किराना घराण्यातील काले खाँ यांच्या घरात १८७२ रोजी त्यांचा जन्म झाला. घरातील वातावरण संगीताला पोषक असल्याने त्यांनी लहान वयातच गायन कला आत्मसात केली.
अवघ्या सहाव्या वर्षापासून गायन कला आत्मसात करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेत पंधराव्या वर्षी त्यांनी गानप्रभुत्व मिळविले. संगीतातील अनेक गोष्टी आत्मसात केल्यानंतर त्यांनी देशात भ्रमण केले. म्हैसूर, गुजरात दौऱ्यात गानमाधुर्याने त्यांनी लोकांची मने जिंकली. बडोद्याचे कलाप्रेमी राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी खाँसाहेबांना दरबारी गायक म्हणून नियुक्त केले.
बडोद्यात चार वर्षे त्यांनी मोठा लौकिक मिळविल्यानंतर १८९८ मध्ये खाँसाहेब मिरजेस आले. मिरजेत त्यांना प्लेगचा आजार झाल्याने त्यांनी मीरासाहेब दर्ग्यात जाऊन गानसेवा केली. यामुळे ते पूर्ण बरे झाल्याने मीरासाहेबांवर त्यांची श्रध्दा होती.
मीरासाहेबांच्या प्रत्येक उरूसात खाँसाहेब उरूसादिवशी दर्ग्याच्या आवारातील झाडाखाली बसून गायन करीत. सुमारे चाळीस वर्षे हे व्रत त्यांनी पाळले होते. मद्रासच्या दौऱ्यावर गेल्यानंतर दि. २७ आॅक्टोबर १९३७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर मीरासाहेब दर्ग्याच्या आवारात दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या स्मृतिनिमित्त १९३८ पासून दर्गा उरूसात मोठी संगीत सभा आयोजित करण्यात येते.
दर्गा संगीत सभेत देशातील किराना घराण्याचे दिग्गज गायक-वादक हजेरी लावतात. १९३८ मध्ये दर्गा उरूसातील पहिल्या स्मृती संगीत सभेचे आॅल इंडिया रेडिओवरून प्रक्षेपण केले होते.
अब्दुल करीम खाँ यांनी सवाई गंधर्व, पं. भीमसेन जोशी, सुरेशबाबू माने, बाळकृष्ण कपिलेश्वर, दशरथ मुळे, रोशनआरा बेगम, गंगूबाई हनगल, शंकरराव सरनाईक, कैवल्यकुमार यासारखा मोठा शिष्यसंप्रदाय निर्माण केला. या शिष्यांनी किराना घराण्याच्या गायकीचा पूर्ण देशात प्रसार केला. खाँसाहेबांची कन्या हिराबाई बडोदेकर यांच्या पुढाकाराने मिरजेत स्मृती स्मारक मंदिर उभारले.