ओळी :- शहरातील काॅलेज काॅर्नर रोडवरील जुनी इमारत धोकादायक बनली आहे. या इमारतीचा पाठीमागील भाग कोसळला आहे. (छाया : सुरेंद्र दुपटे)
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भिंतीला भेगा, छताचा भाग कोसळलेला तर कुठे संपूर्ण इमारतच धोकादायक बनलेली, तरीही जीवाची पर्वा न करता अशा धोकादायक इमारतीत लोक राहत आहेत. महापालिका क्षेत्रात तब्बल ३७९ धोकादायक इमारती असून त्यात ८०० हून अधिक लोक वास्तव्यास आहेत. या इमारतीच्या मालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतीत मात्र कोणीच वास्तव्यास नाही, ही एकमेव दिलासादायक बाब आहे.
महापालिका क्षेत्रातील गावठाण परिसरासह नदीकाठच्या भागात धोकादायक इमारतीचे प्रमाण मोठे आहे. गावठाणमधील जुनी घरे, वाडे धोकादायक बनली आहेत. त्यात न्यायप्रविष्ठ बाबीमुळे अनेक घरांचे पुनर्निमाण करण्यात अडचणी आहेत. तर काही घरांच्या दुरुस्तीत आर्थिक अडचणीत आहेत. २०१९ मध्ये सांगली व मिरज शहराला महापुराचा फटका बसला होता. त्यामुळे नदीकाठ व गावठाणमधील धोकादायक घरांची संख्या वाढली आहे.
सध्या महापालिकेच्या चार प्रभाग समितीत ३७९ घरे धोकादायक आहेत. त्यात अतिधोकादायक घरांची संख्या ५० हून अधिक आहे. पण या घरात सध्या कोणीच राहत नाही. तर किरकोळ दुरुस्तींच्या घरांची संख्या सर्वाधिक आहे. याच घरात मोठ्या संख्येने लोक राहत आहेत. कुठे भिंतीला भेगा गेल्या आहेत, तर कुठे एखादा भाग कोसळला आहे. पण अशा स्थितीत राहणेही तितकेच धोकादायक आहे.
चौकट
वारंवार दिल्या नोटिसा
शहरातील अतिधोकादायक व धोकादायक इमारत मालकांना वारंवार नोटिसा दिल्या आहेत. पण त्यांच्याकडून इमारत उतरून घेण्याची कार्यवाही होत नाही. त्यामुळे आता या इमारती महापालिकेच्या वतीने उतरून त्याचा खर्च मालकांकडून वसूल करणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
चौकट
इमारत पडल्यास कोण जबाबदार?
उच्च न्यायालयाने एका खटल्यास धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या स्थलांतराची जबाबदारी पोलिसांवर सोपविली आहे. पण पोलिसांकडून अपेक्षित कार्यवाही होताना दिसत नाही. तर महापालिकेकडूनही दरवर्षी केवळ नोटिसांचा फार्स केला जात आहे. त्यामुळे भविष्यात एखादी इमारत पडून दुर्घटना घडल्यास नेमके कुणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न आहे. शिवाय अशा इमारतीत राहणाऱ्या नागरिकांची जबाबदारी मोठी आहे.
चौकट
कोट
- आमची इमारत ६० ते ७० वर्षांपूर्वीची आहे. ती धोकादायक बनली आहे. तशी नोटीसही मिळाली. त्याला आम्ही उत्तर दिले आहे. महापालिकेनेच इमारत उतरून घेण्याची विनंती केली आहे. - हरि अवसरे
- कोरोनामुळे इमारत उतरून घेता आलेली नाही. आताही महापालिकेची नोटीस मिळाली आहे. लवकरच आम्ही इमारत उतरून घेऊ. जरी महापालिकेने उतरून घेतली तरी आम्ही त्याचा खर्च देण्यास तयार आहोत - शामराव पाटील
- पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतीचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला. संबंधित मालमत्ताधारकांनाही पालिकेच्या वतीने नोटिसा बजाविल्या आहेत. त्यांनी इमारत उतरून न घेतल्यास त्यांच्यावर खटला दाखल केला जाईल. - दिलीप घोरपडे, सहायक आयुक्त, मिरज