अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : सांगली जिल्ह्यातील सहकारी बॅँकांनी राष्टÑीयीकृत आणि खासगी बॅँकांना सर्वचबाबतीत मागे टाकून गरुडभरारी घेतली आहे. सहकारी बॅँकांनी तब्बल ८ हजार ३५६ कोटी १५ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. गरजूंना कागदपत्रांसाठी अडवणूक न करता आणि बॅँकांमध्ये हेलपाटे मारायला न लावता तब्बल ३ हजार ३०९ कोटी ४७ लाख रुपयांची विक्रमी कर्जे देऊन गरजूंना मदत केली आहे.
राष्टÑीयीकृत बॅँकांचा १२ ते १५ टक्के ढोबळ एन.पी.ए. असताना, या बॅँकांचा फक्त ६.४० टक्के एवढा एन.पी.ए ठेवण्यात यश मिळविले आहे. ३१ मार्च २०१७ च्या अखेरच्या वर्षभरात सहकारी बॅँकांना तब्बल ७६ कोटी ५ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे.सांगली जिल्ह्यात राष्टÑीयीकृत आणि खासगी बॅँकांपेक्षा सहकारी बॅँकांच्या शाखांची संख्या २५४ एवढी सर्वाधिक आहे. जिल्ह्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक वगळून २१ सहकारी बॅँकांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. २००९ पूर्वी सर्वच सहकारी बॅँकांकडे बघण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन अत्यंत वाईट झाला होता. पण आता जिल्ह्यातील सहकारी बॅँकांची वाटचाल यशाच्या शिखराकडे चालू आहे.
सहकारी बॅँका गरजूंना तात्काळ मदत करत असल्याने वसुलीलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सहकारी बॅँकांच्या थकबाकीदारांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होत चालले आहे. रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडियाच्या नियमानुसार बॅँकांचा ग्रॉस एनपीए १० टक्केपेक्षा जास्त नसावा. राष्टÑीयीकृत बॅँका आणि खासगी बॅँकांचा एनपीए तब्बल १२ ते १५ टक्के आहे, तर जिल्ह्यातील सहकारी बॅँकांचा ग्रॉस एनपीए फक्त ६.४० टक्के एवढा आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या नियमानुसार निव्वळ अनुत्पादित कर्जे ७ टक्केच्या आत पाहिजेत. राष्ट्रीयीकृत बॅँकांची ९ ते १२ टक्केच्या दरम्यान अशी कर्जे आहेत, तर जिल्ह्यातील सहकारी बॅँकांची फक्त १.६५ टक्के एवढीच अनुत्पादित कर्जे आहेत. यातील ११ बॅँकांची तर शून्य कर्जे आहेत.
स्पर्धेच्या या युगात सहकारी बॅँकांनी ग्राहकांना सेवा देत व्यवसायात चांगलीच वाढ केली आहे. सर्व बॅँका १ लाखांपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरवत आहेत. काही बॅँका कर्जदारांचा विमाही उतरवत आहेत. याचा फायदा कर्जे न बुडता पाठीमागील कुटुंबांनाही होत आहे.जिल्ह्यातील या बॅँकांनी २०१८ लोकांना रोजगार दिला आहे. कर्जदारांच्या संख्येतही दरवर्षी १० ते १५ टक्के वाढ होत आहे. जिल्ह्यातील २१ पैकी २० बॅँका सभासदांना दरवर्षी ६ ते १२ टक्के लाभांश देत आहेत. बॅँकांनी यावर्षी १६ कोटी ७५ लाख एवढा नफ्यावरील कर भरला आहे.वीस बॅँका नफ्यातजिल्ह्यातील सहकारी बॅँका सक्षम २१ बॅँकांपैकी २० सहकारी बॅँका नफ्यात आहेत. या बॅँकांच्या नफ्यात १० ते १५ टक्के दरवर्षी वाढ होत आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या नियमानुसार सी.आर.ए.आर. ९ टक्के आवश्यक आहे. जिल्ह्यातील बॅँकाचा तो १५.१९ टक्के आहे. हे सदृढ बॅँकांचे लक्षण आहे. याचा अर्थ असा, बॅँकांनी १०० रुपयांचे कर्ज दिले, तर १५ रुपये १९ पैसे भांडवल हे बॅँकांचे स्वत:चे आहे. २१ पैकी २० बॅँका सभासदांना दरवर्षी लाभांश देत आहेत, तर २१ पैकी २० बॅँकांना आॅडिट वर्ग ‘अ’ आहे.कोण, काय म्हणाले?जिल्ह्यातील सहकारी बॅँकांचे कामकाज खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. शासनाची कसलीही मदत न घेता आणि कोणत्याही बॅँकांचे कर्ज न काढता सगळ्या बॅँका सक्षम झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच सहकारी बॅँकांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे.- भगवंत आडमुठे,मुख्य कार्यकारी अधिकारी,बाबासाहेब देशमुख सहकारी बॅँकजिल्ह्यातील सर्वच सहकारी बॅँकांनी काटेकोर नियोजन आणि ग्राहकांना सेवा देत आहेत. ग्रामीण भागातील गरजूंसाठी सहकारी बँका अतिशय फायदेशीर ठरत आहेत. ग्रामीण भागातील पत नसणाºयांची सहकारी बँका पतनिर्माण करण्याचे कार्य करीत आहेत. नफ्यावर तब्बल १६ कोटी ७५ लाख एवढा आयकर भरुन बँकिंग क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.- यु. टी. जाधव, माजी अध्यक्षप्राथमिक शिक्षक बँक