सांगली : रिक्षापरवाने, बॅचबिल्ला व चालक परवान्यासाठी शाळा सोडल्याचे बनावट दाखले व गुणपत्रिका आरटीओ कार्यालयात जमा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. गेल्या चार दिवसांपासून आरटीओ कार्यालयात वाहन परवाने प्रकरणाच्या फायलींची तपासणी केली जात आहे.
आतापर्यंत ८० हजार फायलींची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १५ दाखले सापडले आहेत. अजूनही तपासणी सुरू असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.अटकेतील मुख्य संशयित किरण होवाळे यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या आठवड्यात अटक केली आहे. आतापर्यंत सदाशिव देवकुळे, नंदकुमार कुंभार, अशोक इंगळे, बशीर मुल्ला, हणमंत गोल्लार यांना अटक केली आहे. सध्या सर्वजण पोलीस कोठडीत आहेत.
होवाळे याने वाहनाचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी चिंचणी (ता. तासगाव) येथील डी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व तासगावमधील यशवंत हायस्कूलचे आठवी तसेच नववी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रके तसेच शाळा सोडल्याचे बनावट दाखले होवाळे याने दिले होते. अनेक वाहनचालकांनी होवाळेकडून हे दाखले घेऊन आरटीओ कार्यालयात जमा केले आहेत. सांगलीसह कोल्हापूर, सातारा व पुणे येथील आरटीओ कार्यालयातही याच प्रकारचे बनावट दाखल देऊन वाहन परवाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे आरटीओ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून डी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचणी व यशवंत हायस्कूल, तासगाव या दोन शाळांच्या गेल्या तीन वर्षात किती दाखले परवाना काढण्यासाठी जोडले गेले आहेत, याची माहिती देण्याची विनंती केली आहे. पण अजून एकाही आरटीओ कार्यालयात ही माहिती दिली नाही.
सांगली आरटीओ कार्यालयात पोलिसांनी दुसऱ्यांदा स्मरणपत्र पाठविले आहे. सांगली आरटीओ कार्यालयात गेल्या तीन वर्षातील वाहन परवान्याच्या ८० हजार फायलींची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये तासगाव व चिंचणीच्या हायस्कूलचे पंधरा दाखले आढळून आले आहेत. तपासणीचे काम अजूनही सुरू असल्याचे आरटीओ कार्यालयातील अधिकाºयांनी सांगितले.संशयित वाढणारआतापर्यंत सहा संशयितांना अटक केली आहे. आरटीओ कार्यालयातून माहिती मिळाल्यानंतर संशयितांची संख्या वाढणार आहे. ज्यांनी होवाळेकडून दाखले घेऊन आरटीओ कार्यालयात जमा केले, त्या सर्व वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई केली जाणार आहे. गरज पडल्यास आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.