लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या शनिवारपासून सुरू झालेल्या बेवारस वाहन जप्तीच्या मोहिमेत आठ दिवसांत ८१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. शनिवारी सांगलीतील १० वाहने पथकाने जप्त केली आहेत.
सांगली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बेवारस वाहने पडून असल्याने याचा वाहतुकीला अडथळा होत होता. यामुळे अशी बेवारस आणि रस्त्यावर विनावापर पडून असणारी वाहने जप्त करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले होते. त्यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी केलेल्या नियोजनानुसार दोन पथकाद्वारे तिन्ही शहरांत मागील शनिवारपासून बेवारस वाहन उचलण्याची मोहीम गतीने सुरू आहे. या मोहिमेत सहायक आयुक्त सहदेव कावडे, एस. एस. खरात, सचिन पाटील, दत्तात्रय गायकवाड आणि अतिक्रमण विभागप्रमुख दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे, प्रणिल माने, आदी सहभागी झाले होते. मोहीम अशीच सुरू राहणार असून, नागरिकांनी आपली रस्त्यावरील विना वापरात असणारी वाहने तातडीने काढून घ्यावीत, अन्यथा त्यांच्या वाहनावर जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा अतिक्रमण विभागप्रमुख दिलीप घोरपडे यांनी दिला आहे. तसेच ज्यांची वाहने जप्त केली आहेत त्यांनी दोन दिवसांत आपली वाहने दंड भरून न्यावीत, अन्यथा ती वाहने लिलावात काढली जातील, असा इशाराही घोरपडे यांनी दिला आहे.