सांगली : लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्या, तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपयांची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने मिळविली असल्याचे चौकशीत समोर आले आहे. विष्णू मारूतीराव कांबळे (वय ५९, रा. बारबोले प्लॉट, शिवाजीनगर, बार्शी, जि. सोलापूर) असे अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्यासह पत्नीवरही विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. विष्णू कांबळे हा सांगलीत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होता. त्यावेळी लाचेची मागणी करून ती स्विकारताना ‘लाचलुचपत’ने त्यास पकडले होते. ७ मे २०२२ रोजी त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता. यावेळी घेतलेल्या घरझडतीत १० लाख एक हजार १५० रुपये मिळून आले होते. या रकमेबाबत कांबळेकडे विभागाने खुलासा मागितला होता. त्यावर कोणतेही कागदपत्रे कांबळे याच्याकडून देण्यात आली नव्हती.विष्णू कांबळे व त्याच्या पत्नी जयश्री विष्णू कांबळे यांनी १६ जून १९८६ ते ६ मे २०२२ या कालावधीत संपादीत केलेली मालमत्ता ही ज्ञात स्त्रोताच्या विसंगत असल्याने ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपये इतकी रक्कम अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केली व त्यात जयश्री हिनेही प्रेरणा दिल्याने दोघांवरही विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
उत्पन्नापेक्षा ८३ लाखांचे जास्त उत्पन्न, सोलापूरच्या निवृत्त शिक्षण अधिकाऱ्यावर सांगलीत गुन्हा दाखल
By शरद जाधव | Published: December 06, 2023 6:47 PM