इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील दिवंगत शिक्षक आणि त्यांच्या पत्नी अशा दोघांना वेगवेगळ्या वित्तीय संस्था आणि टपाल कार्यालयात ठेवलेल्या ८४ लाख ११ हजार ७३ रुपयांची रोख रक्कम त्यांच्या मुलानेच खोट्या सह्या करून हडपल्याची घटना उघडकीस आली.रवींद्र शंकर सुतार (रा. बोरगाव, ता. वाळवा) असे रक्कम हडप करणाऱ्या मुलाचे नाव आहे. येथील न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश पी. पी. आजगांवकर यांनी पोलिसांकडून आलेला अहवाल आणि कागदोपत्री पुराव्याआधारे विविध कलमांखाली गुन्हा घडल्याचा निष्कर्ष काढून रवींद्र सुतार याच्याविरुद्ध खटला चालवण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या आदेशानुसार रवींद्र सुतार याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४६८ व ४७१ नुसार हा खटला चालवला जाणार आहे. फिर्यादीतर्फे ॲड. फिरोज मगदूम यांनी न्यायालयात काम पाहिले.याबाबत ॲड. मगदूम यांनी दिलेली माहिती अशी, बोरगाव येथील निवृत्त शिक्षक शंकर यशवंत सुतार व त्यांच्या पत्नी शकुंतला शंकर सुतार यांनी त्यांच्या नावे वेगवेगळ्या वित्तीय संस्था आणि टपाल कार्यालयात ८४ लाख ११ हजार ७३ रुपयांच्या मुदत ठेव पावत्या ठेवलेल्या होत्या. शंकर सुतार यांचे २०१३ साली निधन झाले. त्यांना रवींद्र शंकर सुतार व उदयसिंह शंकर सुतार अशी दोन मुले आहेत. मात्र, रवींद्र सुतार याने वडिलांच्या पश्चात सख्खा भाऊ उदयसिंह सुतार (रा. पुणे) याच्या गैरहजेरीत वडिलांची रक्कम हडप करण्यासाठी भावाच्या बनावट स्वाक्षरी, संमतीपत्र व बनावट कागदपत्रे तयार करून वडिलांच्या नावाची रक्कम स्वत:च्या नावे करून घेतली.पोलिसांनी योग्य दाद न दिल्याने फौजदारीउदयसिंह सुतार यांनी पोलिसात तक्रार केली; परंतु पोलिसांनी योग्य ती दाद न दिल्याने त्यांनी ॲड. फिरोज मगदूम यांच्यामार्फत येथील न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली. त्यावर न्यायालयाच्या आदेशाने आलेल्या पोलिसांच्या अहवालाची पडताळणी करून न्या. आजगांवकर यांनी सकृतदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष काढत रवींद्र सुतार याच्याविरुद्ध खटला चालवण्याचा आदेश दिला.
खोट्या सह्या करून मुलानेच हडपले आई-वडिलांचे ८४ लाख, सांगली जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 1:24 PM