वाटेगाव : भाटवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीची निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली. याठिकाणी ८५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बालम मुलाणी यांनी काम पाहिले.
भाटवाडी ग्रामपंचायतीत दुरंगी निवडणूक होत असून, ३ प्रभागातील ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी कमी संख्येने मतदार मतदान केंद्रावर येत होते. परंतु, दुपारी मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. यावेळी मतदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून मतदानाचा हक्क बजावला. एकूण २,२८२ मतदारांपैकी १,९३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एका पायाने अपंग असलेल्या शंकर देवकर या ९० वर्षीय वृद्धांनी व्हिलचेअरवरून येत मतदान केले.
ही निवडणूक सत्ताधारी विकास आघाडी विरुद्ध श्री चिलाई देवी परिवर्तन महाआघाडी यांच्यात होत असून, प्रत्येक पॅनेलने ९ जागांसाठी ३ प्रभागात एकास एक उमेदवार उभे केले असून, या १८ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतदार यंत्रात बंद झाले आहे. कासेगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवल्याने निवडणूक शांततेत पार पडली. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते ५.३० असतानाही ५.३० नंतर ४५ मिनिटे उशिरापर्यंत मतदान सुरु होते.
फोटो : १५०१२०२१-आयएसएलएम-वाटेगाव न्यूज १ व २
भाटवाडी (ता. वाळवा) येथे मतदान करण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवून मतदारांची रांग लागली होती.
१५०१२०२१-आयएसएलएम-वाटेगाव न्यूज ३
भाटवाडी (ता. वाळवा) येथे वय वर्षे ९० असलेल्या व एका पायाने अपंग असलेल्या शंकर देवकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.