सांगली : कोरोनाच्या नवा व्हेंरिएट ओमायक्राॅनने प्रशासनाची चिंता वाढविली असतानाच गेल्या महिन्याभरात महापालिका क्षेत्रात ८६ लाेक परदेशांतून आल्याची धक्कादायक माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. यात काही लोक दक्षिण आफ्रिकेतूनही आल्याचे समजते. पालिकेने या लोकांचा शोध सुरू केला असून, त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.
महापालिकेने ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित केली आहे. विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची माहितीही नागरिकांना दिली जात आहे. परदेशांतून आलेल्या लोकांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियातून महिना ते दीड महिन्याच्या काळात ८६ लोक शहरात आले आहेत. त्याची यादी पोलीस प्रशासनाने महापालिकेकडे सुपुर्द केली आहे. या यादीची छाननी करून कोणत्या देशातून किती लोक आले, याची माहिती संकलित केली जात आहे. दुसरीकडे या लोकांचा शोधही सुरू केला आहे. यातील काहीजण अजूनही शहरात वास्तव्यास आहेत; तर काहीजण परत परदेशात गेल्याचे समजते.
आरटीपीसीआर चाचणी होणार
परदेशातून आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. या सर्वच लोकांची आरटीपीआर चाचणी होणार आहे. या चाचणीत पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्यास आणखी नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविले जातील, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.