सांगली : शेकडो लोकांचे बळी, तितकेच जायबंदी झाल्यानंतर अखेर सांगली-पेठ रस्त्याच्या कामाला सुरुवात होत आहे. रस्त्याची ८६० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. राजस्थानच्या आरएसबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला काम मिळाले आहे. या कंपनीची ४८ टक्के कमी दराची निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्वीकारली आहे.वाहनांची मोठी वर्दळ, अपघातांची मालिका, खड्ड्यांमुळे सांगली-पेठ रस्ता कित्येक वर्षांपासून चर्चेत राहिला आहे. जिल्ह्यातील इतर शहरे महामार्गाने जोडली जात असताना पेठ रस्ता तसाच होता. सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून चौपदरीकरणासाठी लढा उभारला गेला. आंदोलने झाली. त्यानंतर राज्य शासनाला जाग आली आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला.
महामार्ग प्राधिकरणाने ४१ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला. ८६० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला. निविदेपूर्वीच आष्टा येथे चौपदरीकरणाच्या कामाचा नारळही फोडण्यात आला. त्यानंतर या कामासाठी देशभरातील १२ कंपन्यांनी निविदा भरली. तांत्रिक निविदा लिफाफा उघडून दोन महिने उलटले तरी दराचा लिफाफा उघडला नव्हता. अखेर बुधवारी मुहूर्त मिळाला. राजस्थानच्या आरएसबी कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली. त्यामुळे लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.
४८ टक्के कमी दराची निविदामहामार्ग कामाच्या निविदा ४० टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहेत; पण सांगली-पेठ रस्त्यासाठी ४८ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. रस्तेकामाच्या अंदाजपत्रकापेक्षा निम्म्या दराने निविदा आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कामाच्या दर्जाबाबत संशयसांगली-पेठ रस्त्यासाठी कमी दराने निविदा आल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी दर्जाबाबत संशय व्यक्त केला आहे. सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर म्हणाले की, कमी दराने निविदा आली असली तरी स्थानिक अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम करून घ्यावे. या कामावर सांगलीकर लक्ष ठेवून असतील. काँग्रेसचे सरचिटणीस आशिष कोरी म्हणाले की, कमी दराच्या निविदेमुळे संशयाला वाव आहे. अंदाजपत्रक आणि निविदा मंजूर रकमेत मोठी तफावत आहे. महामार्ग प्राधिकरणाने चुकीचे अंदाजपत्रक तयार केले का?
सांगली ते पेठ रस्त्याचे दर्जेदार काम होण्यासाठी आग्रह राहणार आहे. रस्ता झाल्यामुळे सांगलीहून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्यांची सोय होणार आहे. हळद व साखर व्यापारवाढीस मदत होईल. प्रलंबित मागणी पूर्णत्वास जात असल्याचा मनस्वी आनंद आहे. - संजय पाटील, खासदार