सांगली : सांगली पाटबंधारे मंडळासाठी १५६४ पदे मंजूर असून, त्यापैकी ८६९ पदे रिक्त आहेत. सध्या ६९५ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांसह पाटबंधारे मंडळाचा भार आहे. त्यांच्यावर कामाचा ताण आहे. काही रिक्त पदांवर बेरोजगार अभियंत्यांना डावलून वरिष्ठांच्या मर्जीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.
सांगली पाटबंधारे मंडळाकडे कृष्णा, वारणा नद्यांवरील उपसा सिंचन योजना, पाणी वाटप व्यवस्थापन, टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची जिल्ह्यातील विविध कार्यालये आणि ओगलेवाडी-कऱ्हाड (जि. सातारा) येथील टेंभू योजनेच्या कार्यालयाचा समावेश आहे. तेथील सहायक कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, सहायक अभियंता श्रेणी एकची १७ पदे रिक्त आहेत. वर्ग दोनमध्ये शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी दोन यांचा समावेश असून, त्यांची ११० पदे रिक्त आहेत. वर्ग तीनमध्ये वरिष्ठ, कनिष्ठ लिपिक, मोजणीदार, कालवा निरीक्षक, दप्तर कारकून, आरेखक आदी पदांचा समावेश असून, यांची ५५८ पदे भरलेली नाहीत. वर्ग चारमध्ये शिपाई, चौकीदार, कालवा टपालींचा समावेश असून ,त्यांची १८४ पदे रिक्त आहेत. यामुळे सिंचन योजनांसह इतर कामांना खीळ बसली आहे. नवीन योजनांचे आराखडे ठप्प झाले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील लक्ष घालणार आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
चौकट
पगार शासनाचा, काम ठेकेदाराचे
रिक्त पदांमुळे काम थांबू नये म्हणून कंत्राटी पद्धतीने सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंत्यांच्या नियुक्तीचे अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. या पदांवर नियुक्ती करताना सेवानिवृत्तांना आणि तेही मर्जीतील उमेदवारांनाच प्राधान्य दिले जात आहे. ते कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कंपन्यांना ठेका मिळवून देण्यापासून ते त्या कंपनीचे सर्व व्यवहार सांभाळण्यापर्यंत सर्व कामे करीत आहेत. पगार शासनाचा आणि काम ठेकेदाराचे, असा कारभार सुरू आहे. कुशल सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना संधी मिळत नाही.
कोट
सांगली पाटबंधारे विभागाकडे रिक्त पदांची संख्या मोठी असल्यामुळे कामात अडचणी येत आहेत. ती भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. एमपीएससी परीक्षेद्वारे पदे भरली जात आहेत. कोरोनामुळे परीक्षा न झाल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे.
-मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.
चौकट
पाटबंधारेकडील रिक्त पदे
मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे
वर्ग १ ५७ ४० १७
वर्ग २ २११ १०१ ११०
वर्ग ३ ९८६ ४२८ ५५८
वर्ग ४ ३१० १२६ १८४
एकूण १५६४ ६९५ ८६९