सांगली , दि. २८ : अवघड क्षेत्रात काम, पती-पत्नी एकत्रीकरण व गंभीर आजार अशा तीन प्रकारातील शिक्षकांची सोय करण्यासाठी जिल्ह्यातील ३८२ जणांच्या प्रशासकीय, तर अधिकारप्राप्त खो पध्दतीमुळे आणि सर्व तालुक्यात समान पदे ठेवण्यासाठी ५०८ अशा ८९० शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदेतून होणार आहेत.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली असून सचिव असिम गुप्ता सोमवार दि. ३० आॅक्टोबररोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
राज्य शासनाने प्रथमच शिक्षकांच्या बदल्यांचा मोठा घोळ घालून ठेवला आहे. त्यामुळे शिक्षक अध्यापनापेक्षा संगणक कक्षातच माहिती भरण्यात व्यस्त आहेत. बदल्यांचे काय होणार याची चौकशी करण्यासाठी शिक्षक तालुका आणि जिल्हा परिषदेत फेऱ्या मारत आहेत.
न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, अशी शिक्षक संघटनांमध्ये चर्चा रंगली होती. मात्र ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी शिक्षकांच्या नियमानुसार बदल्या होणारच अशी भूमिका घेतली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेकडून शिक्षकांच्या बदल्यांबाबतची माहिती भरून घेण्याचे काम सुरू ठेवले आहे.
संवर्ग एक ते तीनमध्ये अवघड क्षेत्र, पती-पत्नी एकत्रीकरण, गंभीर आजार अशा शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांची आॅनलाईन माहिती भरून तयार आहे. या संवर्गातील सांगली जिल्हा परिषदेकडील ३८२ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. या शिक्षकांच्या बदलीमुळे खो बसलेल्या २९४ शिक्षकांच्या नव्याने बदल्या होणार आहेत.
या शिक्षकांचा संवर्ग चारमध्ये समावेश केला आहे. या शिक्षकांना सोयीची बदली आणि चुकांची दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने पोर्टल चालू ठेवले होते. शुक्रवार, दि. २७ आॅक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत ते चालू होते.
पण, दि. २८ आॅक्टोबरनंतर हे पोर्टल बंद होणार आहे. यामुळे शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. या शिक्षकांच्या बदल्या कशापध्दतीने कराव्यात याबद्दल सचिव गुप्ता सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी आॅनलाईन संवाद साधणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये सांगली जिल्ह्यातील सुमारे ८९० शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.