लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथे दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणाऱ्या स्वरूप ज्ञानेश्वर शिंदे (वय ९ वर्षे) या शाळकरी मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.शिंदे मळा येथे नवरात्रीमध्ये दुर्गा मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. काल, रविवारी रात्री मिरवणुकीने मूर्तीचे बंधाऱ्यात विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत वस्तीतील ग्रामस्थ व मुले सहभागी झाली होती. स्वरूपदेखील मिरवणुकीत सहभागी झाला होता. विसर्जनानंतर रात्री दहा वाजता घराकडे परतताना होता. सर्वजण वस्तीजवळ आले, तेव्हा मागून मिरवणुकीचा रिकामा ट्रॅक्टर आला. त्यावेळी स्वरूप ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी गेला, पण चढत असताना तोल जाऊन खाली पडला. त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.
एकुलता एक मुलगाअचानक झालेल्या या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ माजली. कुटुंबियांनी स्वरूपला तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. स्वरूपच्या मृत्यूचे वृत्त समजताच लिंगनूर, शिंदे मळा परिसरात शोककळा पसरली. स्वरूप तिसरीच्या वर्गात शिकत होता. तो एकुलता एक मुलगा होता. वडील ज्ञानेश्वर शिंदे लिंगनूरचे माजी सरपंच आहेत. मिरज ग्रामिण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.