कोल्हापूर : महावितरणने वीज बिलांच्या वसुलीची मोहीम गतिमान केली असून, सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी यास प्रतिसाद दिला आहे. सांगली जिल्ह्यात २५८ कोटी २५ लाख रुपये वसुलीच्या उद्दिष्टापैकी ९४ कोटी २७ लाख रुपये वसूल झाले आहेत.
महावितरणने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनंदिन कारभार चालविण्यासाठी महावितरणसमोर थकीत वीजबिलाची वसुली हा एकमेव पर्याय आहे. वीज ग्राहकांनी ही बाब लक्षात घेऊन वीजबिले भरणा करावीत. वीजग्राहकांना महावितरणच्या अधिकृत वीजबिल भरणा केंद्रावर वीजबिले भरण्याची सोय आहे. घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने महावितरण मोबाईल ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळावर वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास आरटीजीएस व एनईएफटीव्दारे वीजबिल भरण्याकरिता वीजबिलावर महावितरण बँक खात्याचा तपशील दिलेला आहे. ग्राहकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी वीजबिले भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे.