सांगली : जिल्ह्यातील दहा आगारातील ८२३ निलंबित कर्मचाऱ्यांपैकी पाच आगारातील ९४ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी बडतर्फ केले. एसटी महामंडळाच्या सांगली विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी ही कारवाई केली. उर्वरित ५०० कर्मचाऱ्यांवर दि. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बडतर्फीची कारवाई होणार आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपासून आंदोलन चालू केले आहे. डिसेंबर महिन्यात तर शंभर टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी होते. एसटी प्रशासनाच्या कारवाईनंतर सांगली जिल्ह्यातील ४ हजार ५५ कर्मचाऱ्यांपैकी २ हजार २०० कर्मचारी कामावर सहभागी झाले आहेत. कारवाईनंतरही १ हजार ८५५ कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत. म्हणूनच एसटी प्रशासनाने निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यास शुक्रवारपासून सुरुवात केली आहे.निलंबीत ८२३ कर्मचाऱ्यांपैकी २५० कर्मचारी कामावर हजर झाल्यामुळे त्यांची कारवाई मागे घेतली आहे. उर्वरित ६०० कर्मचाऱ्यांवर दि. ३१ जानेवारीपर्यंत बडतर्फीची कारवाई होणार आहे. शुक्रवारी आटपाडी, विटा, पलूस, शिराळा आणि मिरज आगारातील नियमित सेवेतील ९४ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.
या आगारातील कर्मचारी बडतर्फ
विटा : ४६
पलूस : १७
शिराळा : १५
मिरज : १३
आटपाडी : ३
अशी झाली आतापर्यंत कारवाई
दहा आगारातील एकूण कर्मचारी : ४०५५
निलंबित कर्मचारी : ८२३
हंगामी सेवा समाप्ती केलेली कर्मचारी : ११६
बदली केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या : ११७
सुनावणी पूर्ण झालेली कर्मचारी : ६००
नियमित सेवेतील बडतर्फ कर्मचारी : ९४
कारवाईनंतर निलंबित पैकी हजर कर्मचारी : २५०
आजही कर्मचारी आंदोलनात सहभागी : १८५५