सांगली : आटपाडी वनक्षेत्राला शासनाने संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. राज्य शासनाच्या राजपत्रात तसा निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयाने श्वान कुळातील लांडगा, तरस, कोल्हा आणि खोकड या प्राण्यांचे अस्तित्व संरक्षित झाले आहे.शासनाच्या निर्णयामुळे या प्राण्यांची शिकार करण्यास निर्बंध आले असून, त्यांना संरक्षण मिळाले आहे. नव्याने घोषित झालेले आटपाडी संवर्धन राखीव याचे क्षेत्र ९.४८ चौरस किलोमीटर (९४८.८८ हेक्टर) आहे. उत्तरेला मुढेवाडी, पूर्व आणि पश्चिमेला आटपाडी आणि दक्षिणेला भिंगेवाडी, बनपुरी हद्द असे हे वनक्षेत्र आहे.२१ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या १९ व्या बैठकीत हे क्षेत्र नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावर आता अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. प्रस्तावित आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र हे पश्चिमेकडील मायणी संवर्धन क्षेत्र व ईशान्येकडील माळढोक पक्षी अभयारण्य यांच्याशी संलग्न आहे. यामुळे वन्यजिवांना विशाल भ्रमणक्षेत्र उपलब्ध झाले आहे. नामशेष होण्याच्या मार्गावरील लांडग्यासह अन्य प्राण्यांचे यामुळे संवर्धन अपेक्षित आहे.
३६ प्रजातींचे वृक्षया परिसरात अर्धसदाहरित, आर्द्र पानझडी व शुष्क पानझडी असे तीन प्रकारचे वनाच्छादन आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची प्रचंड वैविध्यता दिसून येते. ३६ वृक्ष प्रजाती, ११६ हर्ब प्रजाती, १५ झुडपी प्रजाती, १४ वेल प्रजाती व १ परजीवी वनस्पती आढळून येतात. अनुकूल नैसर्गिक स्थितीमुळे येथे लांडगा, कोल्हा, तरस, ससा आदी वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
अनिल बाबर, पापा पाटील यांच्या पाठपुराव्याला यशआटपाडी वनक्षेत्र संवर्धन राखीव घोषित व्हावे आणि या प्राण्यांचे संरक्षण व्हावे यासाठी मानद वन्य जीव संरक्षक अजित (पापा) पाटील यांनी मोठे प्रयत्न केले होते. आमदार अनिल बाबर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम वन्यजीव विभाग) डॉ. क्लेमेंट बेन यांनीही पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आटपाडीच्या गवताळ, डोंगराळ प्रदेशातील निसर्गाचे, वन्यजिवांचे संवर्धन व संरक्षण होण्यास मदत होणार आहे.