सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ हाेत असताना, शासकीय रुग्णालयातील ताण वाढत आहे. मिरज शासकीय रुग्णालयात पुन्हा एकदा कोविड रुग्णांच्या उपचाराला प्राधान्य देण्यात येत असून, नॉनकोविड रुग्णांवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. कोविड रुग्णालयातील डॉक्टर, इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरली असली तरी सांगलीत परिचारिकांची ९९ पदे रिक्त आहेत. याच आठवड्यात प्रशासनातर्फे पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असली तरी ताेवर उपचारावर ताण असणार आहे.
मिरज शासकीय रुग्णालयात ३२५ बेडची साेय करण्यात आली असून, गेल्या वर्षी मार्चमध्येच या रुग्णालयास कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा सर्व रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. मात्र, आता पुन्हा एकदा मिरजेत केवळ कोविड रुग्णांवरच उपचार करण्यात येत आहेत.
सांगली शासकीय रुग्णालयातील ३९९ अधिपरिचारिकांच्या जागा असून, त्यातील ९९ पदे रिक्त आहेत, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ११ पैकी एक जागा रिक्त असून, त्याची प्रक्रिया या आठवड्यात सुरू झाल्याने एकमेव पदही लवकरच भरण्यात येणार आहे. मिरजेत वैद्यकीय महाविद्यालयाकडून मनुष्यबळाची पूर्तता होत आहे.
चौकट
उपचारावर ताण वाढतोय
शासकीय रुग्णालयात सांगलीसह चार जिल्ह्यांतून रुग्ण दाखल होत असतात. त्यात मिरजेत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केल्याने आता तेथील रुग्णही सांगलीत दाखल होत आहेत. गेल्या वर्षी कोरोना कालावधीत जिल्हा प्रशासनाने ४ महिन्यांच्या मुदतीवर नर्सची पदे भरली होती. त्याचा आरोग्य यंत्रणेला मोठा फायदा झाला होता. आताही प्रशासनाकडून रुग्णालयातील वाढता ताण लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात पदे भरण्यासाठी प्रक्रिया राबविल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. सध्यातरी पदे रिक्त असल्याने अडचणी येत आहेत.
कोट
शासकीय रुग्णालयातील रिक्त पदांबाबत वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर केला आहे. यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली असून, नर्सिंगची पदे भरण्यासाठी लवकरच प्रक्रिया होणार आहे.
डॉ. नंदकुमार गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सांगली