मिरज : ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या खात्यावरील ९० लाखांची रक्कम काढून घेणाऱ्या तोहिद अमीर शरीकमसलत (वय ३२, रा. दर्गा चाैक मिरज) या बँक कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली.ॲक्सिस बँकेत नवीन खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिदने खातेदारांना सेवा देत मुदत ठेव, म्युच्युअल फंडासह बँकेच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. ‘मला नोकरीत बढती मिळविण्यासाठी ठेवींची गरज असून, काही कालावधीसाठी ठेवी ठेवा`, असे सांगत अनेक ग्राहकांकडून रकमा घेतल्या. काही खातेदारांच्या खात्यांचा मोबाईल क्रमांकही परस्पर बदलला. त्याच्या आधारे नेट बँकिंग व मोबाईल बँकिंगद्धारे नऊ जणांच्या खात्यांवरील रक्कम आपल्या मित्रांच्या खात्यांवर वर्ग केली. नंतर ती काढून घेतल्याची तक्रार आहे.ग्राहक अमिना नजीर अहमद शेख यांचे ६ लाख रुपये, गणी गोदड यांचे १२ लाख, हुसेन बेपारी यांचे २३ लाख, शिराज कोतवाल यांचे २३ लाख, वाहिद शरीकमसलत यांचे ११ लाख, मेहबूब मुलाणी यांचे २ लाख, रमेश सेवानी यांचे १६ लाख व अनिल पाटील यांचे २ लाख अशा नऊ खातेदारांची ९० लाखांची फसवणूक केली.
याप्रकरणी बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तोहिदला अटक केली. त्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय आहे. याबाबत तक्रारी देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी केले आहे.