इस्लामपूर : एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्याने ५०० रुपयांच्या सहा बनावट नोटा आयसीआयसीआय बँकेच्या मशिनमध्ये जमा करून बनावट नोटा वापरात आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला. हा प्रकार इस्लामपूर येथील आयसीआयसीआय बँक शाखेत घडला.
याप्रकरणी शाखा उपव्यवस्थापक रवींद्र आबासाहेब महाले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एचडीएफसी बँकेचा अधिकारी संग्राम सदाशिव सूर्यवंशी (वय ३०, रा. कामेरी, ता. वाळवा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून २३ मेपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सूर्यवंशी याने आपल्याजवळ ५०० रुपयांच्या सहा नोटा बनावट आहेत, हे माहीत असूनही त्या तीन हजार रुपयांच्या नोटा आयसीआयसीआय बँक शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये १३ मेच्या रात्री जमा केल्या होत्या. त्यापूर्वी त्याने त्याचा मित्र विशाल मोरे याच्याकडून त्याचा खाते नंबर घेत त्या खात्यावर या बनावट नोटा जमा केल्या होत्या.
मात्र आयसीआयसीआय बँक शाखेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये बनावट नोटा वेगळ्या बॉक्समध्ये जमा होतात. त्यामुळे तीन हजारांची रक्कम विशाल मोरे याच्या खात्यावर जमा झाली नव्हती. १४ ते १६ मे असे तीन दिवस बँकेला सुुटी होती. १७ मे रोजी सकाळी हे कॅश डिपॉझिट मशिन उघडल्यानंतर त्यातील वेगळ्या बॉक्समध्ये ५०० रुपयांच्या सहा बनावट नोटा जमा झाल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेजवरून आणि विशाल मोरे यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर संग्राम सूर्यवंशी याचा हा कारनामा उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.