"त्या' चुकीची फळे काँग्रेस आजही भोगतोय'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 05:35 PM2022-05-14T17:35:45+5:302022-05-14T17:36:04+5:30
इंदिरा गांधींच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे काम केले. आजच्या पिढीला त्यांची पुरेशी माहिती नाही.
सांगली : महाराष्ट्रातील लोकांना राजकारणातून बाजूला करण्याची फळे काँग्रेस पक्ष आज भोगत आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.
जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांनी संपादित केलेल्या ‘वसंतदादा’ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी सांगलीत गरवारे कन्या महाविद्यालयात झाले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साळुंखे बोलत होते. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठातील शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, शैलजा पाटील, डॉ. सिकंदर जमादार, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, बापूसाहेब पुजारी, प्रा. वैजनाथ महाजन, सुनील पाटील, प्रा. अविनाश सप्रे, डॉ. डी. जी. कणसे आदी उपस्थित होते.
‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. साळुंखे म्हणाले, दादा गरीब माणसे हेरायचे. काम करून घ्यायचे. मुंबईत येऊन राजस्थानच्या विकासाला निधी न्यायचे. ते दूरदृष्टीचे नेते होते. इंदिरा गांधींच्या साथीने त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठे काम केले. आजच्या पिढीला त्यांची पुरेशी माहिती नाही.
पारेकर म्हणाले, पुस्तकासाठी माहिती जमा करताना दादा वेगवेगळ्या प्रकारे समजत गेले. अनेक प्रकारची नवी माहिती मिळाली. राजकीय, सामाजिक, प्रशासनातील दादांच्या निकटच्या माणसांना भेटलो. त्यातून संदर्भग्रंथ साकारला.
डॉ. भारती पाटील म्हणाल्या, दादा सर्वसामान्य माणसाचे नेते होते. त्याला समोर ठेवूनच त्यांनी काम केले. यशवंतराव चव्हाण आणि दादा यांच्यात अतिशय प्रेमाचे संबंध होते. या पुस्तकातून त्यांचे अनेक नवे पैलू समजतील. असे नेते मिळणे महाराष्ट्राचे भाग्य म्हणावे लागेल. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात दादांचे वैचारिक स्मारक सांगलीत व्हायला हवे.