सांगली : महापालिकेच्या लोकशाही दिनात आयुक्त सुनील पवार यांच्या दिशेने प्रा. कैलास बजरंग काळे यांनी बूट फेकला. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने महापालिकेत खळबळ उडाली. कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन करीत घटनेच्या निषेधार्थ निदर्शने केली. काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सायंकाळी उशिरा फिर्याद नोंदविण्यात आली.महापालिकेत सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांच्या दालनात उपायुक्त व खातेप्रमुख उपस्थित होते. तीन तक्रारी होत्या. त्यात काळे यांचीही तक्रार होती. २०१२ मध्ये त्यांनी गुंठेवारी नियमितीकरणाचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यासाठी प्रशमन शुल्क भरले आहे. तथापि नियमितीकरणाचे प्रकरण प्रलंबित राहिले. दरम्यान राज्य शासनाने २०२१ मध्ये प्रशमन शुल्कात वाढ केली. प्रशासनाने वाढीव शुल्क भरण्याची नोटीस काळे यांना दिली होती. पण त्यांनी नकार दिला. लोकशाहीदिनी सुनावणीवेळी काळे यांनी आयुक्तांसमोर वस्तुस्थिती मांडली.यावेळी आयुक्तांनी प्रस्ताव मंजुरीत विलंबाबद्दल दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, २०१२ च्या दराप्रमाणे २०२३ मध्ये शुल्क आकारता येणार नाही, असे स्पष्ट केले. काळे यांनी मागील दराप्रमाणेच शुल्क भरले असल्याने प्रमाणपत्र द्यावे, असा आग्रह धरला. त्यातून त्यांचा रागाचा पारा चढला. त्या भरातच त्यांनी आयुक्तांच्या दिशेने बूट भिरकावला. प्रसंगावधान राखत आयुक्तांनी तो चुकवला. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना चोप देत दालनाबाहेर नेले. पोलिसांना बोलावून ताब्यात देण्यात आले.महापालिका कार्यालयाच्या आवारात हा प्रकार समजताच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत निदर्शने केली. नंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी महापालिकेत धाव घेत आयुक्तांना भेटून काळे यांची बाजू मांडली. प्रा. गौतमीपुत्र कांबळे, सुरेश दुधगावकर, किरणराज कांबळे आदींनी शहर पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांचीही भेट घेतली. रात्री उशिरा प्रा. काळे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
आयुक्तांवर पुष्पवृष्टीआयुक्त पवार यांनी काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. आयुक्तांनी काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. पण दोषीवर कारवाई होत नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.
गुंठेवारी प्रशमन शुल्क वाढल्याने ते भरण्याबाबत काळे यांना नोटीस दिली होती. लोकशाही दिनातही त्यांना प्रमाणपत्र देण्यास विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईचे आश्वासन दिले. तरीही त्यांनी आयुक्तांच्या खुर्चीच्या दिशेने बूट भिरकावला. त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आहे. - सुनील पवार, आयुक्त, महापालिका