सांगली : सांगलीवाडी येथील मगदूम प्लाॅटमध्ये चेदीलाल केवट यांच्या तिघांच्या पुठ्ठा गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत पत्र्याचे शेड, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. एक सिलिंडरही आगीत फुटला. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. शिवाय चार सिलिंडरही बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.सांगलीवाडीच्या मगदूम प्लाॅटमध्ये उत्तर प्रदेशच्या चेदीला केवट, अमितकुमार केवट, जितेंद्र केवट यांच्यासह चार ते पाच पुठ्ठ्याची गोदामे आहेत. याच ठिकाणी पत्रावजा शेडमध्ये हे लोक रहातात. सोमवारी सकाळी बहुतांश लोक व्यवसायानिमित्त घराबाहेर होते. तर लहान मुले, महिला घरात होत्या. दुपारच्या सुमारास अचानकच पुठ्ठ्याला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. महिला व लहान मुलांनी वेळीच सुरक्षितस्थळी गेली. केवट बंधूची तीनही गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी होती.या आगीत कागदी पुठ्ठे, प्लास्टिक जळून खाक झाले. घरातील भांडी, कपडे व इतर साहित्यही जळले. पत्रे वितळले होते. महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख विजय पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यातच एक सिलिंडरचा स्फोट झाला. जवानांनी चार सिलिंडर बाहेर काढले. तीन गाड्यांच्या मदतीने दहा खेपा करीत दोन तासाच्या परिश्रमानंतर आग विझविण्यात यश आले.
सांगलीवाडीत पुठ्ठा गोदामाला आग, आगीत सिलिंडरचा स्फोट; लाखांचे साहित्य खाक
By शीतल पाटील | Published: April 24, 2023 7:24 PM