सांगली : थकीत ऊस बिल मिळवण्यासाठी २८ शेतकऱ्यांनी रायगाव, ता. कडेगाव येथील केन ॲग्रो साखर कारखान्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. २०१८-१९ च्या गळीत हंगामात ऊस गाळपास दिलेल्या शेतकऱ्यांना बिल मिळाले नाहीत. जवळपास दोन कोटी ९९ लाख रुपये थकीत आहेत.शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले म्हणाले, केन ॲग्रो साखर कारखान्यास २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी ऊस घेतलेल्या शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळाले नाहीत. सांगली जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही उसाची बिलं पाच वर्षांत मिळाली नाहीत. वारंवार कारखाना प्रशासन पैसे देतो, एवढेच सांगत आहेत. पुढे काहीच होत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलासाठी कडेगाव पोलिस ठाण्यात मंगळवार दि. २३ जानेवारी २०२४ रोजी २८ शेतकऱ्यांनी ऊस बिल मिळावीत, अशी तक्रार दाखल केली आहे. केन ॲग्रो साखर कारखाना प्रशासनाने प्रतिटन २६०० रुपयेप्रमाणे दर जाहीर केला होता. या दरानुसार ऊस गाळप झाल्यापासून १४ दिवसात उसाचे बिल शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहेत. परंतु, जवळपास दोन कोटी ९९ लाख रुपयांचे थकीत बिल शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. महसुली कायद्यातील तरतुदीनुसार वसुलीस दिरंगाई होऊ लागल्याने 'ऊस नियंत्रण आदेश- १९६६' व ' आवश्यक वस्तू अधिनियम - १९५५' मधील फौजदारी नियमानुसार ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाने फसवणूक केली आहे. पैशाचा गैरवापर, विश्वासघात केला, या कारणाने कारखाना चालक व कारखाना प्रशासन विरुद्ध पोलिसांत ही तक्रार दिली आहे.ऊस बिल मिळण्यासाठी तक्रारदार बाळासाहेब चव्हाण, राहुल सावंत, रामचंद्र कणसे, फुलाबाई सावंत, नारायण कणसे, पोपट देवकर, ईश्वर कणसे, लक्ष्मण कदम, भीमराव जरग, रामचंद्र उथळे, भीमराव मोहिते आदी २८ शेतकऱ्यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ऊस उत्पादकांची यादी न्यायालयात सादर२०१८-१९ च्या गळीत हंगामातील दोन कोटी ९९ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे. या शेतकऱ्यांची यादी न्यायालयात आम्ही सादर केली आहे. न्यायालयाकडून संबंंधित शेतकऱ्यांना निश्चित पैसे मिळणार आहेत. २०२०-२१ नंतर एकाही शेतकऱ्यांचे पैसे थकीत राहिले नाहीत, असा खुलासा केन ॲग्रो साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जयकर पाटील यांनी दिली.