इस्लामपूर : पंचवीस वर्षीय तरुणीचा तब्बल १४ वर्षे पाठलाग करत विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पाेलिस दलातील निलंबित उपनिरीक्षकाविराेधात इस्लामपुरात गुन्हा दाखल झाला. शंकर जयवंत पाटणकर (३२, रा. बोरगाव, ता. वाळवा) असे त्याचे नाव आहे.पीडितेच्या फिर्यादीवरून शंकर पाटणकर याच्याविरुद्ध विनयभंगाच्या विविध कलमासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा करताना पाटणकर याने दुचाकी (क्र. एमएच १० सीडब्ल्यू १००) आणि मोटार (क्र. एमएच १० डीसी १००) अशा दोन वाहनांचा वापर केला आहे.पीडिता सहावीत असल्यापासून पाटणकर तिचा पाठलाग करत होता. जानेवारी २००९ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत त्याने तिचा मानसिक छळ केला आहे. ‘तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत हा पाटणकर अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग करत होता. मोबाइलवर व्हिडीओ संपर्क करत स्वतः विवस्त्र होऊन पीडित मुलीकडेही अशीच मागणी करत होता.
तसेच ती नृत्य स्पर्धेसाठी जाईल त्याठिकाणी जाऊन पाटणकर व्हिडीओ चित्रीकरण करायचा. कधी दुचाकी तर कधी मोटार आडवी मारत मुलीस अडवून तिचा हात धरत होता. हा सर्व त्रास असह्य झाल्यावर पीडितेने पोलिसात धाव घेतली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद काटे अधिक तपास करत आहेत.मुंबईतही गुन्हा दाखलबोरगावमधील पाटणकर कुटुंब नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. पोलिस सेवेत असणारे हे कुटुंब सावकारीतही कुख्यात आहे. त्यांच्या सावकारीतून बनेवाडीतील दोन लहान मुलांसह पती-पत्नी असे चार जणांचे यादव नावाचे कुटुंब मृत्यूच्या खाईत लोटले गेले आहे. शिवाय पाटणकर कुटुंबातील मुंबई पोलिसात असणाऱ्या शंकरविरुद्ध शिवाजीनगर-गोवंडी येथील २४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा मार्च २०२२ मध्ये दाखल आहे. या मुलीच्या मोबाइलवर त्याने अश्लील संदेश आणि छायाचित्रे पाठवली होती. आता इस्लामपूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध हा दुसरा गुन्हा दाखल झाला.