मिरज : नळासमोर भांड्यातील पाणी पिल्याच्या कारणावरून गायीचे शिंग मोडणाऱ्या एकाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर सज्जाद सिराजउद्दीन हलिमा (वय ४०, रा. बुधवार पेठ, कनवादकर हौद, मिरज) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.बुधवार पेठेत भारत नेमाडे यांच्या मालकीच्या पांढऱ्या रंगाच्या देशी खिलार गायीने हलिमा याच्या नळासमोर पाण्याच्या भांड्यात तोंड घातले. यामुळे सज्जाद याने रागाच्या भरात देशी गायीचे एक शिंग हाताने निर्दयपणे तोडून तिला विकलांग केले. शिंग मोडल्याने गाईच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. या घटनेमुळे तेथे गर्दी जमून तणाव निर्माण झाला. शिवसेना, शिवप्रतिष्ठानसह हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात धाव घेऊन आरोपीवर कारवाईची मागणी केली. सज्जाद हलिमा याने निर्दयपणे तहानलेल्या गायीचे शिंग हाताने तोडून तिला विकलांग केले. याबाबत हलिमा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५ व प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलमाप्रमाणे त्याच्याविरुद्ध सरकारतर्फे पोलिस कर्मचारी लक्ष्मण कौजलगी यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. जखमी गायीवर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
Sangli: भांड्यातील पाणी पिले, रागाने गायीचे शिंग मोडले; मिरजेत एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 5:34 PM