मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे गावाजवळ तीन वाहनांच्या भीषण अपघातात वीटभट्टी मजुराच्या अमित जगन्नाथ पवार (वय १०, रा. गोपाळवस्ती सातारा) या दहा वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे संतप्त जमावाने टेम्पोच्या काचा फोडल्या.दहिवडी येथून वीटभट्टी मजुरांचे कुटुंब मालवाहतूक रिक्षातून प्रापंचिक साहित्य घेऊन आपल्या गावी जात होते. सोमवारी दुपारी एक वाजता भोसे फाटा येथे आल्यानंतर सोलापूरच्या दिशेकडून भोसे गावाकडे येणाऱ्या ट्रॅक्टर (क्र. एमएच १० डीव्ही ६८९) ला ओव्हरटेक करणाऱ्या मालवाहतूक रिक्षात पाच लहान मुले व पती, पत्नी हे ऊसतोड मजूर बसले होते. मालवाहतूक रिक्षा ओव्हरटेक करताना मागून आलेल्या पिकअप टेम्पो (एमएच ११ बीएल ६१६५) ने जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून जोरात धडकली. रिक्षात पाठीमागील बाजूस बसलेला अमित जगन्नाथ पवार हा मुलगा रस्त्यावर पडला. यावेळी मागून आलेला पिकअप टेम्पो त्याच्या अंगावरून गेल्याने अमित याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बालकाच्या मृत्यूमुळे संतप्त जमावाने टेम्पोच्या काचा फोडल्या. याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलिस व ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलिस करत आहेत. चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूने वीटभट्टी मजूर कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता.
Sangli: भोसेजवळील अपघातात बालकाचा मृत्यू, संतप्त जमावाने टेम्पोच्या काचा फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 4:16 PM