अशोक पाटीलइस्लामपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात सहा जागा लढवणार असल्याचे यापूर्वीच राजू शेट्टी यांनी जाहीर केले. तोच शेट्टी-तूपकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. याचाच आनंद रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झाला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी संघटनेचे नेते आगामी सर्वच निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पटलावर दिसू लागले आहेत.राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. संघटना मजबुतीसाठी शेट्टी यांनी राज्यात संपर्क वाढवला आहे. विदर्भातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे. परंतु येथेही गटबाजी उफाळली आहे. परिणामी शेट्टी आणि तुपकर यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत, बी. जी. पाटील यांचा इस्लामपूर-शिराळा मतदार संघ होमपीच आहे. रघुनाथदादा पाटील व बी. जी. पाटील यांनी त्यांची संघटना बीआरएस पक्षाच्या छायाछत्राखाली नेली आहे. सर्वच शेतकरी नेते आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य ठेवून आहेत.सदाभाऊ खोत यांच्यावर भाजपचा शिक्का पडला आहे. याच ताकदीवर त्यांचे राजकारण सुरू आहे. शेट्टी यांच्याकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच शेट्टी-तूपकर यांच्यातील अंतर्गत वादाच्या चर्चेने रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या समर्थकांना आनंद झाला आहे.
राजू शेट्टी यांनी स्थापन केलेली शिस्तभंग समिती नव्हे, ती शांतता भंग समिती आहे. ती बेशिस्त समिती म्हणून संबोधली जात आहे. या युनो समितीने माझ्यावरही कारवाई केली होती. रविकांत तुपकरवर कारवाई करण्यास पुण्यात जमलेली समिती मुकाट्याने घरी परतली. या सर्व घडामोडींचे उत्तर २०२४ लोकसभा निवडणुकीत मिळेल. तुपकर यांच्यावर कारवाई करण्याइतपत त्यांचे हात मजबूत नाहीत. - सदाभाऊ खोत, रयत क्रांती शेतकरी संघटना
सदाभाऊ खोत यांनी भाजपमध्ये त्यांची उंची किती आहे मोजावी. स्वाभिमानीमुळे मंत्रिपद मिळाले. आता भाजपमध्ये हलके-फुलके पद मिळवून दाखवावे. शेट्टी-तुपकर वाद मिटेल. खोत यांनी आमच्या संघटनेतील अंतर्गद वादाचे भांडवल करू नये. - भागवत जाधव, तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना