सांगली : चॅप्टर केसच्या सुनावणीत मदतीसाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना आटपाडी तहसील कार्यालयाकडील महसूल सहाय्यक महेबुब नबीलाल बागवान (वय ४२ वर्ष, सध्या रा. दत्त नगर, मशीदीसमोर आटपाडी, मुळ रा. लोहारा बुद्रुक, इंदिरानगर, जि. उस्मानाबाद) याला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारावर दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने चॅप्टर केसची सुनावणी निवासी नायब तहसिलदारांकडे सुरू आहे. सुनावणीमध्ये वरिष्ठांना सांगून चॅप्टर केसमध्ये पर्सनल बॉण्डवर सोडण्यासाठी व चॅप्टर केस निकाली काढण्यासाठी महेबुब बागवान यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी २० फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्राराची पडताळणी करण्यात आली. बागवान याने तक्रारदाराशी तडजोड करून तीन हजार रुपये दोन दिवसात आणून देण्यास सांगितले. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आटपाडी तहसिल कार्यालयात सापळा रचला. यावेळी बागवान याला तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
त्याच्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, अंमलदार धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, सलीम मकानदार, राधीका माने, ऋषीकेश बडणीकर, अतुल मोरे, सुदर्शन पाटील, अनिस वंटमुरे यांच्या पथकाने केली.