सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळप्रश्नी सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली असून, बैठकीत विमानतळ मंजुरीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासहित एमआयडीसी, विमानतळ प्राधिकरण, महसूल, पर्यावरण आदी विभागांचे अधिकारी बैठकीसाठी रवाना झाले आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेतली आहे. कवलापूर येथील विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कवलापूर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, काही महिन्यांपूर्वी कवलापूर विमानतळाला तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय उद्योग मंत्रालयाने घेतला होता. ही जागा महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचे आदेशही दिले होते. आता मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावल्याने या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा निरोप आल्याने ते रविवारीच मुंबईला रवाना झाले. जिल्हाधिकारी राजा दयानिधी हे सध्या रजेवर असून, सोमवारी ते पदभार घेणार होते. मात्र, आता सांगलीत न येता ते थेट मुंबईतील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एमआयडीसीच्या क्षेत्रीय अधिकारी वसुंधरा जाधव यांच्यासह जिल्ह्यातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनाही या बैठकीस निमंत्रित करण्यात आले आहे.यापूर्वीही कवलापूर विमानतळाविषयी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे केंद्रीय अधिकारीही बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
१६० एकर जागेची उपलब्धताकवलापूर ग्रामपंचायत हद्दीत विमानतळ उभे करायचे झाले, तर मूळची १६० एकर जमीन उपलब्ध आहे. याशिवाय लागणारी जमीन योग्य मोबदला देऊन तडजोडीने अधिग्रहीत करावी लागणार आहे. त्यामुळे भूसंपादनाविषयी प्राथमिक निर्णय बैठकीत होण्याची चिन्हे आहेत.
अधिकाऱ्यांची माहिती संकलनाची लगबगबैठकीबाबतच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांकडून रविवारी सुट्टीदिवशीही माहिती संकलनाची लगबग सुरू होती. शासनाकडे पाठवलेले प्रस्ताव, यापूर्वी झालेले निर्णय आदींची माहिती संकलित करून घेण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपणास बैठकीची सूचना आली असल्याचे सांगितले.