सांगली : तुंग (ता. मिरज) येथील डाॅक्टरचे तीन लाख ३० हजार रुपये लांबविणाऱ्यास सांगली ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. रोहित बाजीराव आखळे (वय ३२, रा. केदारवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तुंगसह इस्लामपूर येथील एक गुन्हा उघडकीस आला आहे.
तुंग (ता. मिरज) येथे डॉ. अभिनंदन आप्पासाहेब वाडकर यांचे संजीवन क्लिनिक नावाने क्लिनिक आहे. शुक्रवार, दि. १० मार्च रोजी भरदिवसा त्यांच्या रुग्णालयातून तीन लाख ३० हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली होती. त्यानंतर डॉ. वाडकर यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक या चोरीचा तपास करत होते. पोलिसांचे पथक गस्तीवर असताना तुंगमधील चोरी संशयित आखळे याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. यात त्याने गुन्ह्याची कबुली देत इस्लामपूर येथेही अशाचप्रकारे चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून इस्लामपुरातील चोरीतील १४०० रुपये, तर तुंग येथील चाेरी केलेले दोन लाख ५४ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मगदूम, बाळकृष्ण गायकवाड, रमेश कोळी, अरुण पाटील, स्वप्नील नायकवडी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
आखळे रेकॉर्डवरील
ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केलेला आखळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर सांगली, सातारा, रायगड, कोल्हापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात २२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.