श्रीनिवास नागे, सांगली: माडग्याळ (ता. जत) येथे सनमडी-माडग्याळ रस्त्यावर दामूच्या ओढ्यावरील पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अशोक सन्मुख माळी (वय ४७ रा. माडग्याळ) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली. घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यात झाली आहे.
माडग्याळ येथे खंडोबा मंदिर जवळील शेतात अशोक माळी कुटुंबासह राहतात. त्यांनी स्वत:च्या शेतात शेणखत घालण्यासाठी गावातील परीट वस्तीवरील खत विकत घेतले होते. सोमवारी सकाळी आठपासून खंडोबा मंदिर जवळील शेतात स्वतः ट्रॅक्टरने खत आणत होते. सकाळपासून दोन खेपा खत आणले होते. शेतात खत ओतून ते रिकामा ट्रॅक्टर घेऊन परीट वस्तीकडे निघाले होते.
दरम्यान गावालगत सनमडी-माडग्याळ रस्त्यावरील दामूच्या ओढ्यात लहान अरुंद पूल आहे. ओढ्यालगत वळण असून या ठिकाणी काटेरी झुडपे आहेत. यामुळे समोरुन येणाऱ्या वाहनाचा अंदाज या ठिकाणी येत नाही. अशोक माळी ट्रॅक्टर घेऊन पुलावर आले असता समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना अचानक पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी ट्राॅली पुलाच्या कठड्याला अडकली; तर ट्रॅक्टर ओढ्यात पडला. ट्रॅक्टरचे इंजिन व स्टेअरिंगखाली अशोक माळी अडकून पडले. यात त्यांना गंभीर मार लागला होता. ग्रामस्थांनी त्वरित ट्रॅक्टर बाहेर काढले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांच्या डोक्याला, छातीला जोराचा मार लागल्याने मृत्यू झाला. घटनास्थळी उमदी पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास उमदी पोलिस करीत आहेत.
मयत अशोक माळी यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे. ते पेपर विक्रेते भीमाण्णा माळी यांचे मोठे भाऊ होत.