सांगली : शहरातील गजबजलेल्या स्टेशन चौकात सिटी काॅर्नर रेग्झिन हाऊसला सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. बाजूच्या दुकानात वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याची ठिगणी पडून आग लागल्याचे सांगण्यात आले. यात सीट कव्हर, दुकानाची सीटचे नुकसान झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.स्टेशन चौकात पोलिस उपअधिक्षक कार्यालयाच्या समोरच सिटी काॅर्नर रेग्झिन नावाचे दुकान आहे. त्याच्या शेजारी गॅस शेगडी विक्रीच्या दुकानात वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंगची ठिणगी रेग्झिनच्या दुकानातील जुन्या सीट कव्हर, फोमवर पडली. दुकानातून धुराचे लोट येऊ लागले. चौकात महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कार्यालय आहे. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला.
अग्निशमन विभागाने धाव घेत आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. वेळीच आग विझल्याने आजूबाजूच्या दुकानाचे नुकसान टळले. मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यासह धीरज पावणे, प्रसन्न पाटील, केशव खरमाटे, खंडेराव घुगरे, अभिजित कोरे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.