सांगली : कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचे लोखंडी बरगे बदलण्यासाठी पाटबंधारे विभागाने बिगर सिंचन विभागातून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याची निविदा लवकरच निघणार असून नवीन लोखंडी बरगे बसवले जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.‘लोकमत’ने खराब झालेल्या बरगे बदलण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली होती. त्यानुसार निधी मंजूर झाला.सांगली बंधाऱ्यात पूर्वी लाकडी बरगे वापरले जात होते. ते खराब झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी लोखंडी बरगे बसवण्यात आले. दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने तेही गंजून गेले. त्याची पाणी अडवण्याची क्षमता कमी झाली. त्यातून पाणी वाहून जाऊ लागले. त्याने टंचाई काळात बंधाऱ्यातील पाणी कमी होऊ लागले. गेल्या चार महिन्यांत दोन वेळा नदी कोरडी पडली. त्याला काही प्रमाणात हे बरगे कारणीभूत होते.पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर म्हणाल्या की, बंधाऱ्यातून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण वाढले होते. आता बरगे बदलण्यासाठी बिगर सिंचनमधून ३० लाखांचा निधी आम्ही मंजूर केले आहे. त्यात सगळे बरगे बदलले जातील, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार निविदा काढली जाईल.
कृष्णा नदीवरील सांगली बंधारा असल्याने शहरातील सहा लाख लोकांना पाणीपुरवठा शक्य आहे. तो मजबूत असणे गरजेचे आहे. त्याची आम्ही पाहणी केली. बरगे खराब झाल्याने पाणी वाहून जात होते. यावर्षी टंचाई आहे. पाण्याचा जपून वापर गरजेचा आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला विनंती केली. तातडीने बरगे बदलावेत, त्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी केली. त्याला यश आले. निविदा प्रक्रिया लवकर राबवून उन्हाळा सुरू होण्याआधी हे काम पूर्ण करावे. - पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस