सांगली : शहरासह कोल्हापूर शहर, मिरज ग्रामीण भागातून दुचाकी लंपास करुन त्याचे सुटे भाग विकणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इस्लामपूरमध्ये जेरबंद केले. उमर ईर्शाद सुतार, गौस शौकत शेख (दोघेही रा. तिरंगा चौक, शिक्षक कॉलनी, इस्लामपूर ) आणि ऋतुराज ऋषिकेश साठे (रा. म्हैसगाव, ता. माढा, जि. सोलापूर ) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार दुचाकी, दुचाकींचे सुटे भाग असा दोन लाख ६६ हजार २०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे.
शहरासह जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या तपासाच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक इस्लामपूर परिसरात गस्तीवर होते. यात इस्लामपूर येथील संशयितांची माहिती मिळाली. पथकाने इस्लामपूर येथील शिक्षक कॉलनीत असलेल्या महाराष्ट्र ॲटो गॅरेज परिसरात सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीचे सुटे केलेले भाग गॅरेजमध्ये विक्रीसाठी ठेवल्याचे सांगितले.पथकाने केलेल्या तपासणीत दुचाकीचे इंजिन, चेसीस यासह अन्य सुटे भाग आढळून आले. त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी आणि अन्य सुटे भाग असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, कुमार पाटील यांच्यासह नागेश खरात, दरीबा बंडकर, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
चार गुन्हे उघडकीससंशयितांनी दुचाकी चोरून थेट त्याचे सुटे भागच विक्रीस सुरूवात केली होती. या टोळी कडून विश्रामबाग, सांगली शहर, मिरज ग्रामीण आणि कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथील गुन्हे उघडकीस आले आहेत.