सांगली : कोल्हापूर येथे शासकीय नोकरीत असणाऱ्या युवतीस लग्नाचे आमिष दाखवून सांगलीत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घ़डला आहे. अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अशा दोघांवर बलात्कार आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचर प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन संभाजी गायकवाड (वय २५, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि अमोल कुरणे (रा. कुंडलवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.हा प्रकार मार्च ते जून २०२४ या कालावधीत सांगलीत घडला. पीडित युवती कोल्हापूरची रहिवासी आहे. संशयित गायकवाड याने तिच्यासमवेत लग्न करण्याचे आमिष दाखवून ओळख वाढविली. विश्वास संपादन करुन तिला सांगलीत १०० फुटी रस्ता परिसरातील एका सदनिकेत वारंवार नेले. तेथे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता लग्नाला नकार दिला. जातीवाचक उल्लेख केला.त्यामुळे तिने सचिनच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यावेळी अमोल कुरणे याने `सचिनसोबत तुझे लग्न होणार नाही. त्या बदल्यात एक लाख रुपये देतो` असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव करीत आहेत.
लग्नाच्या आमिषाने कोल्हापुरातील युवतीवर सांगलीत अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 2:08 PM