आटपाडी : लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश बाजार समितीला दिले आहेत. त्यानुसार बाजार बंद झाले; मात्र शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून आटपाडी बाजार समितीच्या समोरच महामार्गावर शेतकरी व व्यापाऱ्यांनी बाजार भरवत प्रशासकीय आदेशाला कोलदांडा दिला.आटपाडीतील न्यायालयापासून ते आबानगर चौक यादरम्यान आटपाडीतील बायपास रोडवरच मोठ्या प्रमाणात व्यपारी व शेतकरी पशुपालक यांनी हजेरी लावत शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरविला. यावेळी आटपाडी पोलिसांनी हस्तक्षेप करीत चारचाकी घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांना तिथून गाड्या घेऊन जाण्याच्या सूचना करीत कारवाईची मोहीम राबवली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी शहरापासून काही अंतरावर जाऊन वाहने उभी केली होती.आटपाडी बाजार समितीने ११ सप्टेंबरपासून शेळ्या-मेंढ्यांचा बाजार बंद असल्याचे जाहीर करून लम्पीच्या प्रसारास आळा घालण्याचे आवाहन केले. तरीही मोठ्या प्रमाणात पशुपालक शेतकरी व व्यापारी यांनी खरेदी-विक्रीसाठी प्रशासनाच्या आदेशाला झुगारून गर्दी केली.बंदचे आदेश, पण बाजार भरू नये, यासाठी कोणतीही पूर्वतयारी नाहीलम्पी हा आजार मोठ्या जनावरांना होत असून, तो शेळ्या व मेंढ्यांना होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी, मग तो बंद का करण्यात आला, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने घेतलेली भूमिका ही पशुपालक शेतकरी व व्यापारी यांच्या पोटावर पाय देणारी असल्याचेही मत अनेक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले. बाजार समिती व प्रशासनाने बाजार बंदचे आदेश दिले असले तरी बाजार भरू नये, यासाठी कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याने शनिवारी बाजार समितीच्या समोरच बाजार भरविण्यात पशुपालकांना यश आले.
सांगली: आटपाडीत रस्त्यावरच भरवला शेळ्या-मेंढ्यांचा बाजार, प्रशासनाच्या आदेशाला कोलदांडा
By अविनाश कोळी | Published: September 17, 2022 7:13 PM