अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, मिरज: चार वर्षांपूर्वी घरातील आई, वडिल व भावाचा मृत्यू झाल्याने एका उच्चशिक्षित महिलेवर मानसिक आघात झाला. या धक्क्यामुळे मनोरुग्ण झालेल्या निराधार महिलेने गेली महिनाभर फ्लॅटमध्ये कोंडून घेतले. गलिच्छ व मरणासन्न अवस्थेत असलेल्या या महिलेबाबतची माहिती शेजारच्या एका सतर्क नागरिकाने दिल्यानंतर मंगळवारी आस्था बेघर निवारा केंद्रामार्फत तिची सुखरुप सुटका करण्यात आली.
मिरजेच्या आशा चित्रपटगृहासमोरील एका अपार्टमेंटमध्ये तिचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये निराधार व मनोरुग्ण झालेली ही उच्चशिक्षित महिला रहात होती. महिन्याभरापासून तिने स्वत:ला कोंडून घेतले. घराच्या आतील बाजुने तिने कुलूप लावले होते. शेजारच्या लोकांनी खिडकीतून तिला अन्न देण्यास सुरुवात केली, मात्र बिस्कीटांशिवाय तिने काहीही खाल्ले नाही. संपूर्ण घराला शौचालयाचे स्वरुप प्राप्त झाले होते. अपार्टमेंटमध्ये दुर्गंधी पसरल्याने शेजारच्या नागरिकांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली. त्यांनी ही तक्रार शासकीय रुग्णालयाकडे वर्ग केली. शासकीय रुग्णालयाने ती महापालिकेकडे वर्ग केली. अखेर तक्रारदार नागरिकाला आस्था बेघर निवारा केंद्राचा क्रमांक देण्यात आला.केंद्राच्या संचालक सुरेखा शेख यांनी तिच्या सुटकेसाठी पुढाकार घेतला. खिडकीतून तिच्याशी संवाद साधला. बऱ्याच वेळाने तिने प्रतिसाद दिला. कुलूप काढण्यास तिला तयार केले, मात्र तिला किल्ली सापडली नाही. अखेर कटरने कोयंडा तोडून आत प्रवेश करण्यात आला. मरणासन्न अवस्थेत तिची सुटका करण्यात आली. तिची स्वच्छता करुन आरोग्य तपासणी करण्याचे काम केंद्राने केले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेख यांच्यासह सविता काळे, वैशाली कांबळे, सुनिता शिरढोणे, सोहेल शेख, संतोष खेडेकर, अवधूत कामत यांनी ही मोहिम यशस्वी केली.
चौकटकुजलेल्या मृतदेहासोबत राहिली
सप्टेंबर २०२०मध्ये याच फ्लॅटमध्ये तिच्या आई, वडिलांचा मृत्यू झाला होता. कुजलेल्या मृतदेहासोबत त्यावेळी ती तीन दिवस राहिली होती. त्यावेळीही तिची सुटका करण्यात आली होती.कोट
सदर महिलेला निवारा केंद्राच्या पुढाकाराने रेस्क्यू ऑपरेशन करून तिचा ताबा घेतला आहे. भविष्यातील तिच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने सर्व कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल.- सुरेखा शेख, संचालक, आस्था बेघर निवारा केंद्र